Star Pravah Thriller Serial : ‘स्टार प्रवाह’वर लवकरच ‘काजळमाया’ ही थ्रिलर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर प्रमुख भूमिका साकारणार आहे.

‘स्टार प्रवाह’वर काजळमायाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एक हटके कथानक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आरुष वालावलकर ( अक्षय केळकर ) रात्री उशिरा जिन्यावरून जात असतो. इतक्यात त्याला पैंजणांचा आवाज येतो. तो आजूबाजूला पाहतो तर तिथे कुणीच उभं नसतं. पण, जसा आरुष पुढे चालत जातो तशी त्याच्या मागून एक महिला अंधारात उभी असल्याचं या मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

पर्णिका नावाच्या चेटकीणीची ही गोष्ट आहे. तिला चिरतारुण्याचं वरदान आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते.

स्टार प्रवाहच्या या नव्या प्रयोगाबद्दल सांगताना स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, “गूढ, उत्कंठावर्धक असे विषय कायम रसिकांच्या स्मरणात रहातात. प्रेक्षकांनी अशा विषयांना आधी सुद्धा पसंती दिली आहे. ‘काजळमाया’ हा स्टार प्रवाहसाठी एक नवा विषय आहे जो इतर मालिकांप्रमाणेच आकर्षणाचा विषय ठरेल. नवा विषय, नवी पात्रं आणि कलाकारांच्या साथीने ‘काजळमाया’ खूप लोकप्रिय होईल अशी खात्री वाटतेय.”

‘काजळमाया’ मालिकेतल्या आरुष या पात्राविषयी सांगताना अक्षय म्हणाला, “मुख्य अभिनेता म्हणून स्टार प्रवाहबरोबरची ही माझी पहिली मालिका आहे. कम्फर्ट झोनच्या बाहेरचं हे पात्र आहे. आरुष कवी मनाचा आहे. अत्यंत साधा, सरळ, कुटुंबावर प्रचंड प्रेम करणारा. त्याचा चांगुलपणा ही त्याची ओळख आहे. आरुष मराठी विषयाचा प्रोफेसर आहे. त्याचं व्यक्तिमत्व सामान्य असलं तरी मराठी विषयातलं त्याचं ज्ञान कमाल आहे. पहिल्यांदा गूढ मालिकेत अशा पद्धतीचं पात्र साकारत असल्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे” अशा भावना अक्षय केळकरने व्यक्त केल्या आहेत.