Star Pravah Head Satish Rajwade : छोट्या पडद्यावरील विविध वाहिन्यांवर येत्या काळात नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी सध्या मराठी वाहिन्यांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दोन वाहिन्यांमधील टीआरपीची स्पर्धा, कलाकारांच्या भूमिका याबद्दल ‘स्टार प्रवाह’चे हेड सतीश राजवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत, जाणून घेऊयात…
तुमच्याकडे एका नायिकेने मालिका गाजवली, तिच नायिका आता दुसऱ्या वाहिनीवर मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे…या स्पर्धेकडे तुम्ही कसे पाहता? या प्रश्नावर ‘तारांगण’ला दिलेल्या मुलाखतीत सतीश राजवाडे म्हणाले, “ती नायिका आधी सुद्धा वेगळ्या वाहिनीवर काम करायची. त्यानंतर मग आमच्याकडे मालिका केली. पण, या सगळ्या गोष्टींपेक्षा मला असं वाटतं की, आमची स्पर्धा ही फक्त आमच्याशी आहे.”
सतीश राजवाडे पुढे सांगतात, “आपण एका व्यवसायात आहोत. त्यामुळे दुसरीकडे काय चालुये, कसे शो येत आहेत या सगळ्याबद्दल निश्चितच चर्चा होते. आपला व्यवसाय चांगला चालावा, यासाठी नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा कराव्या लागतात. पण, मी पुन्हा म्हटल्याप्रमाणे आमची स्पर्धा कोणत्या दुसऱ्या वाहिनीशी असण्यापेक्षा ती सर्वात आधी स्वत:शी आहे. आपण जास्तीत चांगलं काम कसं करू शकतो, आपल्या मालिका प्रेक्षक जास्तीत जास्त कशा पाहतील याकडे आमचं जास्त लक्ष असतं.”
“आता राहिला प्रश्न आमचे काही कलाकार इतर वाहिन्यांवर गेले किंवा स्पर्धक वाहिन्यांकडे काम करणारे आमच्याकडे आले यांचा…तर, मला असं वाटतं की आपली मराठी मनोरंजनसृष्टी ही एकत्र आहे. फार मोजके कलाकार आहेत जे नाटकात कामं करतात, चित्रपटात काम करतात आणि मालिकाही करतात. त्यामुळे मला असं वाटतं की, कोणत्याही कलाकारावर हा आमचा, तो तुमचा असा स्टॅम्प लावायला नको. शेवटी आपल्याला सगळ्यांना मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे.” असं सतीश राजवाडेंनी सांगितलं.
दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ वाहिनी गेल्या काही वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वलस्थानी आहे. काही दिवसांपूर्वीच समृद्धी केळकरची ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका वाहिनीवर सुरू झाली होती. आता लवकरच या वाहिनीवर आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.