कोकणात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना देवाला गाऱ्हाणं घालण्याची पारंपरिक पद्धत आहे. आजवर अनेक शुभकार्यांसाठी हे गाऱ्हाणं घातलं आहे. पण नुकतंच एका मराठी मालिकेसाठी गाऱ्हाणं घालण्यात आलं आहे आणि ही मालिका म्हणजे स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ (Kon Hotis Tu Kay Jhalis Tu) मालिका. नव्याने सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी संपूर्ण टीम कोकणात दाखल झाली आहे. वाहिनीचे हेड सतीश राजवाडे यांनी मालिकेतील कलाकारांसह कुडाळ गाठले असून लवकरच मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ रेल्वे स्थानकात ही सगळी कलाकार मंडळी पोहोचताच स्थानिक महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. शिवाय त्यांनी पोहोचल्या पोहोचल्या सर्व कलाकारांना कोकम सरबतही दिले. याचे खास क्षण सोशल मीडियावर पाहायला मिळाले. अशातच अभिनेते वैभव मांगले यांनी मालिकेसाठी गाऱ्हाणं घातल्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजश्री मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये वैभव मांगले यांनी देवाला घातलेलं गाऱ्हाणं असं आहे की…

बाय माझे आयशी… तिन्ही सांजेची वेळ असा अन् तू मागणं घेण्यास राजी हायस (आहेस)… बा लक्ष्मी नारायणा तू मागणं घेण्यास राजी हायस (आहेस)… तसोच (तसाच) तुझा प्रेक्षकही मागणं घेण्यास राजी हा (आहे)… तर बा देवा महाराजा… आमची स्टार प्रवाह वाहिनीवरील एक मालिका येता (येत आहे) हा जिचा नाव हा ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’… आम्ही आमच्या प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी आम्ही कलाकारांनी घाट घातलेलाय (घातलेला आहे), जी काय मेहनत केलेली हा (आहे), त्या मेहनतीस फळ येवांदे (येऊदे) आणि ही मालिका सगळ्यांच्या पसंतीस उतरांदे (उतरू दे) रे महाराजा… या मालिकेस आणि स्टार प्रवाह वाहिनीस अशीच प्रेक्षकांची साथ मिळांदेत (मिळूदेत) आणि कलाकारांना भरपूर यश मिळांदे (मिळूदेत). जो कोणी या कार्याच्या मध्ये येईल; मग तो उभा असो… आडवा असो… चार पायांचा असो… दोन पायांचा असो…. पोहणारा असो उडणारा वा असो… त्याला तिकडच्या तिकडं आडवा कर आणि या सगळ्यांनाच भरभरून यश दे रे महाराजा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेच्या कोकणातील चित्रीकरणाविषयी अनेक प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे. तसंच या मालिकेच्या कथानकाचीही अनेकांना उत्सुकता आहे. गिरीजा-मंदार ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार असल्याने त्यांचे चाहतेही या मालिकेची आतुरेतेने वाट पाहत आहेत. गिरीजा-मंदार यांच्यासह वैभव मांगले, सुकन्या मोने, साक्षी गांधी, अमित खेडेकर, अमृता माळवदकर हे कलाकारदेखील या मालिकेत झळकणार आहेत.