Star Pravah New Serial Kon Hotis Tu Kay Jhalis Tu : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या २८ एप्रिलपासून ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना गौरी-जयदीपची जोडी आता यश-कावेरीच्या रुपात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेचे दोन प्रोमो आतापर्यंत प्रेक्षकांसमोर आलेले आहेत. या प्रोमोंमधून बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या समोर आल्या आहेत. मात्र, मालिकेतील मुख्य ट्विस्ट काय असेल याबद्दल गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांनी ‘अल्ट्रा मराठी बझ’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

गिरीजा म्हणाली, “मला माहितीच नव्हतं की, आम्ही एकत्र हा शो करतोय. आधी मी मीटिंग वगैरे करून आले होते. त्यानंतर मग इव्हेंट होता. त्यावेळी मंदारने मला स्वत:हून सांगितलं तुला माहितीये ना आपण हा शो करतोय. तेव्हा मी स्वत:च थक्क झाले होते.”

मालिकेबद्दल मंदार म्हणाला, “ही मालिका आमच्या आधीच्या मालिकेपेक्षा खूप जास्त उत्सुकता वाढवणारी आहे. जेव्हा प्रोमो आला तेव्हा मलाही वाटलं होतं की, अरे आता कावेरी मुलाला घेऊन घरी येणार मग, सर्वांना गोष्टी कळणार… हे एवढं सोपं आहे. प्रेक्षकांना पण कथानक समजेल वगैरे असे प्रश्न आम्हाला सुद्धा पडले होते. यात काय ड्रामा आहे? पण, मी तुम्हाला सांगतो ड्रामा हा खऱ्या अर्थाने आताच सुरू होणार आहे.”

“प्रेक्षकांना प्रोमोमध्ये जी परिस्थिती पाहायला मिळाली, ती नेमकी का घडलीये? दोन पात्रांमध्ये नेमके वाद काय आहेत? प्रोमोत दाखवलंय त्याप्रमाणे कावेरी मुलाला घेऊन घरी आलेली आहे पण, ते बाळ तिचं नसतं तिच्या मोठ्या बहिणीचं असतं. त्यामुळे घरात सर्वांना वाटतंय की, कावेरीच या घरची सून आणि माझी वहिनी आहे. पण, मला माहितीये ही माझी वहिनी नाहीये. कारण, यशने त्याच्या वहिनीला पाहिलेलं असतं. मग, ही नेमकी कोण आहे याचा शोध यश घेणार आहे. मालिका जशी पुढे जाईल, त्यानंतर हळुहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. जेवढा प्रोमो सोपा दिसतोय, तेवढा नाहीये.” असं मंदारने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ ही मालिका २८ एप्रिलपासून रात्री ८ वाजता प्रसारित केली जाणार आहे. यामध्ये गिरीजा प्रभू, मंदार जाधव यांच्यासह वैभव मांगले, सुकन्या मोने, साक्षी गांधी, अमित खेडेकर, अमृता माळवदकर यांसारखे कलाकार झळकणार आहेत.