Star Pravah Muramba Serial : सध्या छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर २०२२ मध्ये ‘मुरांबा’ मालिका सुरू झाली. यामध्ये लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाते. सध्या या मालिकेत आलेल्या नव्या टिस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’मध्ये नवा अध्याय सुरु झाला आहे. या मालिकेत सात वर्षांचा लीप आल्यानंतर रमा आणि अक्षयचं नातंही नव्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. सात वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या गैरसमजांमुळे रमा-अक्षय एकमेकांपासून दुरावले आहेत. यामुळेच अक्षयने आपली लेक आरोहीसह नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. तर, रमा कुटुंब व संसारापासून काहिशी दूर जाऊन पाचगणीमध्ये नवी ओळख बनवू पाहतेय.
आतापर्यंत रमाला आपण दोन वेण्यांमध्ये पाहात आलो आहोत. पण, लीपनंतर रमाचा नवीन लूक आता प्रेक्षकांसमोर आला आहे. रमाने आता सगळा भूतकाळ मागे सोडून नवीन आयुष्य जगायचं ठरवलं आहे. भूतकाळाशी असणारी नाळ तोडण्यासाठी तिने आपल्या दोन वेण्या कापल्या आहेत. रमा पाचगणीतल्या सगळ्यात मोठ्या शाळेची ट्रस्टी आहे.
आधीपेक्षा जास्त खंबीर आणि इंग्रजी भाषेवर कमालीचं वर्चस्व असणारी एक नवी रमा आता जगासमोर आहे. रमा जरी भूतकाळ विसरली असली तरी आपल्या मुलीला मात्र ती कधीच विसरली नाही. लेकीपासून दुरावल्यानंतर रमाने गोड खाणं सोडलं आहे. ती सगळ्यांना गोडाचे पदार्थ बनवून देते, खाऊ घालते. पण, ती स्वतः काहीच गोड खात नाही. आपल्या लेकीला तिने बबडू असं नाव दिलं आहे.

आता पुढील भागांमध्ये रमाची आणि तिच्या लेकीची भेट होणार का? रमा-अक्षय पुन्हा एकत्र येणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, ‘मुरांबा’ मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर दुपारी १:३० वाजता प्रसारित केली जाते.