Star Pravah New Serial Nashibvan Watch Promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सध्या नव्या मालिकांची नांदी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच वाहिनीने रुपाली भोसले, चेतन वडनेरे आणि कृतिका देव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘लपंडाव’ मालिकेचा प्रोमो शेअर केला होता. आता या पाठोपाठ वाहिनीवर आणखी एक नवीन मालिका सुरू होणार आहे जिचं नाव आहे ‘नशीबवान’.
‘नशीबवान’मध्ये प्रेक्षकांना गिरीजा नावाच्या मुलीची गोष्ट पाहायला मिळेल. आई-वडिलांचं प्रेम नाही, लहान वयातच आलेली घरची जबाबदारी आणि जगण्यासाठीचा संघर्ष असं खडतर आयुष्य गिरीजाच्या नशिबी आलं आहे. मात्र, तिच्या आयुष्यात येत्या काही दिवसांत असे काही बदल घडतील की ती आयुष्यात खरंच ‘नशीबवान’ आहे याची तिला जाणीव होईल. मालिकेत याच गिरीजाची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री नेहा नाईक साकारणार आहे.
तर, प्रसिद्ध अभिनेते अजय पूरकर या मालिकेत खलनायक म्हणजेच नागेश्वर घोरपडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. नागेश्वर आपल्या पैशांच्या जोरावर सामान्य माणसांना त्रास देतो. खून करायलाही मागेपुढे बघत नाही. देवीची पूजा करतो पण, एखाद्या राक्षसाप्रमाणे लोकांचा छळ करतो. इतका क्रूर वागूनही तो कधीच कोणत्या केसमध्ये अडकत नाही. नेहा नाईक, अजय पूरकर यांच्यासह या मालिकेत प्राजक्ता केळकर आणि गणेश रेवडेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
एकाच दिवशी सुरू होणार २ मालिका
कोठारे व्हिजन्सची निर्मिती असलेली ‘नशीबवान’ ही नवीन मालिका येत्या १५ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रुपाली भोसलेची ‘लपंडाव’ आणि ‘नशीबवान’ या दोन्ही मालिका वाहिनीवर एकाच दिवशी ऑन एअर होणार आहेत. येत्या १५ सप्टेंबरपासून ‘लपंडाव’ ही मालिका दुपारी २ वाजता आणि ‘नशीबवान’ ही मालिका रात्री ९ वाजता प्रसारित केली जाणार आहे.
कोणती मालिका संपणार?
‘नशीबवान’ ही मालिका १५ सप्टेंबरपासून ९ वाजता प्रसारित केली जाईल; त्यामुळे सध्या या स्लॉटला सुरू असलेली शिवानी सुर्वेची ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शिवानीची मालिका गेल्यावर्षी जून महिन्यात सुरू झाली होती. अवघ्या १४ महिन्यांत ही मालिका संपणार आहे.