Star Pravah Nashibwan Promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या काही महिन्यांत दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रुपाली भोसले, कृतिका देव आणि चेतन वडनेरे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘लपंडाव’ मालिका सप्टेंबर महिन्यात सुरू होईल. या पाठोपाठ आता आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो वाहिनीकडून नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेचं नाव व यामध्ये कोण-कोण झळकणार आहेत जाणून घेऊयात…

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच कोठारे व्हिजन निर्मित ‘नशीबवान’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ‘सुभेदार’ सिनेमातील लोकप्रिय अभिनेते अजय पूरकर खलनायकाची भूमिका साकारणार आहेत. ते ‘नशीबवान’ मालिकेत क्रूर, कपटी अशा नागेश्वर घोरपडेंची भूमिका साकारत आहेत.

अजय पूरकर यांच्यासह लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता केळकर या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. यापूर्वी त्या ‘स्टार प्रवाह’च्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत झळकल्या होत्या. ‘नशीबवान’ या नव्या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री नेहा नाईक मालिकाविश्वात मुख्य नायिका म्हणून पदार्पण करणार आहे.

‘नशीबवान’ मालिकेचा प्रोमो

नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये सुरुवातीला अजय पूरकर ( नागेश्वर घोरपडे ) गोकुळाष्टमीचा पाळणा गाताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे मालिकेची नायिका तिच्या वडिलांना दारूच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. इतक्यात एक गुरुजी येतात आणि अजय पूरकरांना सांगतात, आता तुमच्या नशिबाचे फासे उलटे फिरणार आणि हे सगळं ( संपत्ती ) ज्याचं आहे त्याच्याकडे जाणार; यावर नागेश्वर घोरपडे म्हणतात, “मी जिथे तिच्या आई-बाबांना गाडलं तिथे पोरीचं काय? आज नाही मारणार तुम्हाला, सांगून झोपवणार…” यावरून ते मालिकेत खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान, आता ‘नशीबवान’ ही नवीन मालिका दुपारच्या सत्रात सुरू होणार की रात्रीच्या? ही मालिका सुरू झाल्यावर कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार? याचा उलगडा येत्या काही दिवसांत होईल.