Star Pravah Nashibvan Serial : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नशीबवान’ मालिका १५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये लोकप्रिय अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री नेहा नाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, प्रसिद्ध अभिनेते अजय पूरकर यामध्ये खलनायकाची भूमिका साकारत आहेत. ‘नशीबवान’मध्ये प्रेक्षकांना सध्या लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
आता लवकरच मालिकेत आत्याबाईंची एन्ट्री होणार आहे. रुद्रप्रताप घोरपडेची आत्या उर्वशी मोठ्या रुबाबात आलिशान गाडीतून मालिकेत एन्ट्री घेईल. मात्र, तिच्या भरधाव वेगाने गाडी चालवण्यामुळे चिखल उडतो. अर्थात रस्त्यावर चालणाऱ्या माणसांवर चिखल उडतोय की त्यांना अन्य कोणताही त्रास होतोय याबद्दल उर्वशीला काहीच देणंघेणं नसतं. मात्र, हे सगळं गिरीजाला पटत नाही.
गिरीजा रागात म्हणते, “अरे ए…गाडी चालवायची अक्कल नाहीये का?” यानंतर उर्वशी स्वत:ची पर्स उघडते आणि त्यातील पैसे गिरीजाच्या तोंडावर फेकून मारते…यातून एक चांगली डिटर्जन पावडर खरेदी कर आणि धुवून टाक त्याचे कपडे असं उर्वशी तिला रुबाबात सांगते.
पण, गिरीजा अजिबात माघार घेत नाही. ती रागात बाजूचा दगड उचलते आणि खड्ड्यात टाकते. यामुळे उर्वशीच्या अंगावर सगळा चिखल उडतो. याशिवाय गिरीजा तिला खडेबोल देखील सुनावते.
भर रस्त्यात अशाप्रकारे अपमान होणं हे उर्वशीला अजिबात पटत नाही. त्यामुळे घरी पोहोचल्यावर उर्वशी भावनिक ड्रामा करून रुद्रप्रतापचे गिरीजा विरोधात कान भरणार आहेत. आता ऐनवेळी रुद्र कोणाची बाजू घेईल याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.
दरम्यान, उर्वशीची भूमिका अभिनेत्री सोनाली खरे साकारत आहे. ‘नशीबवान’ मालिकेच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनंतर सोनालीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. अभिनेत्री पोस्ट शेअर करत लिहिते, “स्टार प्रवाहच्या परिवारात पाऊल टाकत एका नव्या प्रवासाची सुरुवात करतेय. मी खूप उत्सुक आणि काहीसं दडपण आलंय, पण मनात फक्त एकच भावना आहे ती म्हणजे कृतज्ञता. माझी मालिकेत एन्ट्री होतेय. नक्की बघा”

दरम्यान, आदिनाथ कोठारे, नेहा नाईक, अजय पूरकर, सोनाली खरे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘नशीबवान’ मालिका स्टार प्रवाहवर रोज रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते.