Star Pravah Kajalmaya : ‘स्टार प्रवाह’ने नुकतीच एका थ्रिलर मालिकेची घोषणा केली आहे. याचं नाव आहे ‘काजळमाया’. या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. नवनवे विषय, गुंतवून ठेवणारं कथानक आणि आपल्या कुटुंबाचा भाग वाटतील अशी पात्रं मालिकेत असावीत यासाठी वाहिनी नेहमीच प्रयत्नशील असते. ‘काजळमाया’च्या माध्यमातून सुद्धा वाहिनी एक नवीन व हटके प्रयोग करण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘स्टार प्रवाह’ने दिलेल्या माहितीनुसार ‘काजळमाया’ या मालिकेत प्रेक्षकांना चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या ‘पर्णिका’ नावाच्या चेटकीणीची गोष्ट पाहायला मिळेल. तिला चिरतारुण्याचं वरदान आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. स्वतःचं अस्तित्व जपून सगळ्यांना पायाशी आणण्याची महत्वाकांक्षा तिच्या मनात असते. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तिच्या या महत्वाकांक्षी स्वभावाला जेव्हा आरुषकडून आव्हान मिळतं तेव्हा सुरुवात होते एका अद्भूत गोष्टीला. ही गूढ गोष्ट म्हणजेच ‘काजळमाया’.

‘बिग बॉस’ विजेता सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर ‘काजळमाया’ मालिकेत आरुष वालावलकर हे प्रमुख पात्र साकारत आहे. नव्या मालिकेतील आरुष या पात्राविषयी सांगताना अक्षय म्हणाला, “मुख्य अभिनेता म्हणून स्टार प्रवाहबरोबरची ही माझी पहिली मालिका. कम्फर्ट झोनच्या बाहेरचं हे पात्र आहे. आरुष कवी मनाचा आहे. अत्यंत साधा, सरळ, कुटुंबावर प्रचंड प्रेम करणारा मुलगा अशी त्याची ओळख असते. याशिवाय त्याचा स्वभाव खूपच चांगला आहे. आरुषमध्ये असलेला चांगुलपणा ही त्याची खरी ओळख आहे.”

“आरुष मराठी विषयाचा प्रोफेसर आहे. त्याचं व्यक्तिमत्व सामान्य असलं तरी मराठी विषयातलं त्याचं ज्ञान अफाट आहे आणि विशेषकरुन त्यांला कवितांचीही आवड आहे. पहिल्यांदा गूढ मालिकेत अशा पद्धतीचं पात्र साकारत असल्यामुळे मी प्रचंड उत्सुक आहे” अशी भावना अक्षय केळकरने व्यक्त केली.

दरम्यान, ‘काजळमाया’ मालिका नेमकी कधी सुरू होणार यावर अद्याप वाहिनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. याशिवाय अक्षयसह या मालिकेत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार हे सुद्धा गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.