Star Pravah New Serial Lapandav : छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांची मांदियाळी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच रुपाली भोसलेच्या ‘लपंडाव’ या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, वाहिनीने या मालिकेच्या प्रसारणाची तारीख अन् वेळ जाहीर केली नव्हती. आता नुकताच या मालिकेचा दुसरा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘लपंडाव’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देव मुख्य भूमिका साकारणार आहे. तिच्या भूमिकेचं नाव असेल सखी कामत. तर, अभिनेत्री रुपाली भोसले या मालिकेत सखीच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे. तेजस्विनी कामत असं तिच्या भूमिकेचं नाव असून, तिला सगळे आदराने ‘सरकार’ म्हणतात. सखी आणि तेजस्विनी या मायलेकींचं एकमेकींशी अजिबात पटत नसतं. या सगळ्यात तेजस्विनी तिच्या लेकीचं लग्न ड्रायव्हरशी ठरवते. ही भूमिका अभिनेता चेतन वडनेरे साकारत आहे.

सखी लग्न झाल्यावर प्रचंड आनंदी असते. आपण फायनली सरकारच्या ( आई ) पिंजऱ्यातून सुटलो अशी भावना तिच्या मनात असते. पण, घडतं काहीतरी भलतंच…लग्नानंतर सासरी न जाता सरकारच्या आदेशानुसार तिला तिचा नवरा पुन्हा स्वगृही घेऊन जातो. यामुळे सखीला अश्रू अनावर होतात. तर तेजस्विनी हा आपल्या घरचा घरजावई असल्याचं सर्वांना सांगते. आता ‘लपंडाव’मध्ये नात्यांचा तिढा कसा सुटणार याची अनोखी गोष्ट पाहायला मिळेल.

‘लपंडाव’ केव्हापासून सुरू होणार? कोणती जुनी मालिका संपणार?

‘लपंडाव’ ही नवीन मालिका १५ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जाईल. १५ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता ही मालिका प्रेक्षकांना ‘स्टार प्रवाह’वर पाहता येईल.

सध्या दुपारी २ वाजता ‘शुभविवाह’ ही मालिका प्रसारित केली जात आहे. ही मालिका जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाली होती. त्यामुळे आकाश-भूमीची ही मालिका आता जवळपास अडीच वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये ‘शुभविवाह’ मालिका बंद होणार का? यासंदर्भातील कमेंट्स देखील केल्या आहेत. मात्र, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून अद्याप याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.