Star Pravah New Serial Lapandav : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून काही दिवसांपूर्वीच ‘लपंडाव’ या मालिकेची घोषणा करण्यात आली. या मालिकेच्या पहिल्या प्रोमोला सध्या प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये अभिनेत्री कृतिका देव प्रमुख भूमिका साकारत आहेत. कृतिका व तिच्या पात्राबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…

प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देवला आपण अनेक सिनेमांच्या माध्यमातून भेटलोय. ‘स्टार प्रवाह’वर लवकरच सुरु होणाऱ्या ‘लपंडाव’ या मालिकेतून कृतिका मालिका विश्वात दमदार पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत कृतिका सखी कामत हे पात्र साकारणार आहे. सखी श्रीमंत कुटुंबातील मुलगी असली तरी तिला पैशांचा अजिबात माज नाहीये. अडचणीत असलेल्या व्यक्तीला ती आवर्जून मदत करते. त्यासाठी आपल्या अत्यंत जवळची गोष्ट द्यायलाही ती मागे पुढे पाहत नाही.

सखी स्वभावाने अत्यंत गोड असली तरी भावनेच्या भरात तिच्याकडून अनेकदा विचित्र निर्णय घेतले जातात आणि मग हट्टाने ते पाळलेही जातात. सखीच्या आयुष्यात एकच खंत आहे ते म्हणजे आईचं प्रेम. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत तिला आईचं प्रेम मिळालं. मात्र बाबा गेल्यानंतर आईनेही तिला दूर केलं. आईबरोबर तिचे कायम खटके उडत असतात. मात्र भांडणाच्या निमित्ताने का होईना पण आई आपल्याशी दोन मिनिटं तरी बोलेल हीच भाबडी आशा तिच्या मनात असते.

कृतिका देवची ‘लपंडाव’ ही पहिलीवहिली मालिका आहे. आयुष्यातील पहिली गोष्ट ही नेहमी खास असते. सखी कामत या भूमिकेविषयी सांगताना कृतिका म्हणाली, “स्टार प्रवाहबरोबरचा हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की इतकं छान पात्र साकारण्याची संधी मला मिळाली. सखी कामत अतिशय श्रीमंत घरातली मुलगी आहे. सगळी सुखं तिच्या पायाशी आहेत मात्र आईच्या प्रेमासाठी ती आसुसलेली आहे. सखीच्या मनातली घालमेल नेमकी काय असेल हे साकारण्याचा माझा प्रयत्न असेल. मालिकेची टीम खूपच छान आहे. प्रेक्षकांना ही मालिका नक्की आवडेल”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लपंडाव ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नेमकी केव्हा सुरू होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये कृतिकासह रुपाली भोसले ( सखीची आई ) आणि अभिनेता चेतन वडनेरे प्रमुख भूमिका साकारणार आहे.