Star Pravah New Serial Lapandav Promo : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नुकतीच समृद्धी केळकरची मुख्य भूमिका असलेली ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या पाठोपाठ अवघ्या १५ दिवसांत वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या नव्या सिरियलमध्ये प्रेक्षकांना एक अनोखी कहाणी पाहायला मिळणार आहे. यात प्रमुख भूमिकेत कोण झळकणार जाणून घेऊयात…
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच सुरू होणाऱ्या नव्या मालिकेचं नाव आहे ‘लपंडाव’. या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये दोन जुने चेहरे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आले आहेत. त्यापैकी पहिली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली होती. तिने यामध्ये साकारलेली संजना ही खलनायिकेची भूमिका सर्वांच्या पसंतीस उतरली होती. आता रुपाली या नव्या मालिकेतून पुन्हा एकदा ग्लॅमरस अंदाजात सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.
याशिवाय ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेमुळे सर्वत्र लोकप्रिय झालेला अभिनेता चेतन वडनेरे ‘लपंडाव’मध्ये मुख्य नायकाची भूमिका साकारणार आहे. रुपाली आणि चेतन यांना ‘स्टार प्रवाह’चे प्रेक्षक आधीपासूनच ओळखतात मात्र, या मालिकेची हिरोईन नेमकी कोण असेल याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर प्रोमोमध्ये मुख्य नायिका कोण आहे याचा उलगडा झालेला आहे.
‘लपंडाव’ या नव्या मालिकेत प्रमुख भूमिका लोकप्रिय अभिनेत्री कृतिका देव साकारणार आहे. कृतिका ही अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अभिषेकने यश हे पात्र साकारलं होतं.
‘लपंडाव’ मालिकेचा प्रोमो कसा आहे?
‘लपंडाव’ मालिकेत गोड, हसऱ्या सखीला तिची आई आवाज देते. सखी मोठ्या उत्साहात तिच्या जवळ येऊन तिला “आई…” अशी हाक मारते. पण, रुपाली तिला सांगते आई नाही ‘सरकार’ बोलायचं. यानंतर तिला मनाविरुद्ध लग्न करण्याचे आदेश दिले जातात. सखी या सगळ्याला विरोध करते आणि शेवटी म्हणते मी स्वयंवर करेन. मुलीचं हे वाक्य ऐकताच तेजस्विनी कामत म्हणते, ‘तुझ्या स्वयंवरातला वर मीच ठरवणार!’
शेवटी तेजस्विनी कामत मुलीचं लग्न घरातील ड्रायव्हरशी ठरवते…हीच भूमिका अभिनेता चेतन वडनेरे साकारत आहे. आता ही नवीन मालिका नेमकी कधी सुरू होणार? ‘लपंडाव’ मालिका सुरू झाल्यावर कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याची माहिती लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीकडून शेअर करण्यात येईल.