Marathi Serial TRP Updates : गेल्या अडीच वर्षांत टीआरपीच्या शर्यतीत सायली-अर्जुनच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेने अधिराज्य गाजवलं आहे. या मालिकेत नेहमीच प्रेक्षकांना नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. आता येत्या भागात सायली प्रियाला सुभेदारांच्या घरातून बाहेर काढणार असल्याचा जबरदस्त सीन पाहायला मिळेल. त्यामुळे या मालिकेचं टीआरपीच्या शर्यतीमधील पहिलं स्थान कायम आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे जानकी-हृषिकेशची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत ऐश्वर्याचं कट-कारस्थान सर्वांसमोर उघड करण्याचा सीक्वेन्स चालू आहे. त्यामुळे या कथानकाला प्रेक्षकांची देखील पसंती मिळत आहे. खरंतर, गेली काही महिने ‘ठरलं तर मग’च्या नंतर दुसऱ्या स्थानावर अद्वैत-कलाची ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका असते. पण, गेल्या आठवड्याच्या TRP यादीत मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. दुसऱ्या स्थानावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका असून ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेच्या टीआरपीमध्ये घसरण होऊन अद्वैत-कला थेट पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेला या आठवड्यात ३.५ रेटिंगसह तिसरं स्थान मिळालं आहे. जीवा-नंदिनी, पार्थ-काव्या यांची भांडणं, त्यांच्यातील अप्रत्यक्ष प्रेम हे कथानक सर्वांना आवडू लागलं आहे. यामुळेच या मालिकेने टीआरपीच्या यादीत मोठी झेप घेतल्याचं पाहायला मिळतंय.
यानंतर चौथं स्थान कावेरीच्या ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेने मिळवलं आहे. यासह ‘आता होऊ दे धिंगाणा’ या शोला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नॉन फिक्शन शोच्या टीआरपीमध्ये सिद्धार्थ जाधव होस्ट करत असलेला ‘आता होऊ दे धिंगाणा’ पर्व-४ हा शो आघाडीवर आहे.
‘स्टार प्रवाह’च्या मालिकांचा टीआरपी
१. ठरलं तर मग
२. घरोघरी मातीच्या चुली
३. लग्नानंतर होईलच प्रेम
४. कोण होतीस तू काय झालीस तू
५. लक्ष्मीच्या पाऊलांनी
६. थोडं तुझं आणि थोडं माझं
७. तू ही रे माझा मितवा
८. येड लागलं प्रेमाचं
९. आता होऊ दे धिंगाणा-४ ( नॉन फिक्शन )
१०. साधी माणसं
दरम्यान, येत्या आठवड्यात ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका सुरू होणार आहेत. आता नवीन मालिका सुरू झाल्यावर टीआरपीच्या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेषत: प्रेक्षकांना आदिनाथ कोठारेच्या ‘नशीबवान’ मालिकेकडून प्रचंड अपेक्षा आहेत.