Star Pravah : छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमध्ये सध्या टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी मोठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक जुने कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. तर, बहुतांश वाहिन्यांवर येत्या काही महिन्यांत नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. याशिवाय ज्या कार्यक्रमांना टीआरपी नाहीये, अशा कार्यक्रमांचा चॅनेलकडून गाशा गुंडाळला जात आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘शिट्टी वाजली रे’ हा कार्यक्रम यंदा २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सध्या हा कार्यक्रम शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रसारित केला जातो. मात्र, आता लवकरच हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. दमदार अभिनयाने मन जिंकणारे कलाकार स्वयंपाकात खरंच कुशल आहेत का? याची पोलखोल ‘शिट्टी वाजली रे’च्या रंगमंचावर करण्यात आली. नवनवीन पदार्थ बनवताना कलाकारांची कशी तारांबळ उडाली हे देखील पाहणं मजेशीर ठरलं.
आता लवकरच हा कार्यक्रम ऑफ एअर होईल. कारण, येत्या ९ ऑगस्टपासून ‘आता होऊ दे धिंगाणा’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव हा कार्यक्रम होस्ट करत आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या यापूर्वीच्या तिन्ही सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय या शोचं टीआरपी रेटिंग सुद्धा नॉन-फिक्शन शोच्या कॅटगरीमझ्ये सर्वाधिक होतं. त्यामुळे सिद्धार्थच्या शोकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत.
यावेळी ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या रंगमंचावर थीमपार्कची जादू अनुभवता येणार आहे. थीमपार्कमध्ये ज्याप्रमाणे अद्भूत आणि अविश्वसनीय गोष्टींची सफर घडते अगदी त्याप्रमाणेच धिंगाणाचा मंच भन्नाट गेम्सच्या माध्यमातून मनोरंजनाची धमाल सफर घडवणार आहे. मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या ‘स्मायली काय गायली’, ‘धुऊन टाक’, ‘गोरी गोरी पान गाते किती छान’ या सुपरहिट फेऱ्या नव्या ट्विस्टसह या पर्वातही असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या तीन पर्वात ज्या फेरीची सर्वाधिक चर्चा रंगली त्या साडे माडे शिंतोडेचं भव्यदिव्य रुप या पर्वाचं प्रमुख आकर्षण ठरेल.
दरम्यान, सिद्धार्थ जाधव होस्ट करत असलेला ‘आता होऊ दे धिंगाणा’चा चौथा सीझन ९ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शनिवार-रविवार रात्री ९ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाईल.