Star Pravah & Zee Marathi Serial TRP Ratings : TRP मध्ये अव्वल स्थान पटकावण्यासाठी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये दर आठवड्याला चढाओढ सुरू असते. गेली अडीच वर्षे टीआरपीच्या यादीत सायली-अर्जुनची ‘ठरलं तर मग’ मालिका वर्चस्व गाजवत आहे. याशिवाय नुकताच या मालिकेत वात्सल्य आश्रम केसचा निकाल जाहीर करण्यात आला. या अंतिम निकालाच्या एपिसोडला तब्बल ९.१ TVR मिळाला होता. यावरून या मालिकेची लोकप्रियता किती मोठ्या प्रमाणात आहे याचा अंदाज येतो.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिका दर आठवड्यात टीआरपीच्या शर्यतीत अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. या पाठोपाठ शिवानी सुर्वेची ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका दुसऱ्या स्थानी आहे. तिसरं स्थान अद्वैत-कलाच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने पटकावलं आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात ‘स्टार प्रवाह’च्या या टीआरपी टॉपर असलेल्या तीन मालिकांचा महासंगम पार पडला आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्याच्या टीआरपी आकडेवारीकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर टीआरपीच्या यादीत चौथ्या स्थानी रेश्मा शिंदे व सुमीत पुसावळे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिका आहे. तर, गिरीजा प्रभूची ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ ही मालिका या आठवड्यात पाचव्या स्थानावर आहे.

झी मराठीवर ‘कमळी’चं वर्चस्व

‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकांबद्दल सांगायचं झालं, तर नव्याने सुरू झालेल्या ‘कमळी’ मालिकेने बाजी मारली आहे. ‘कमळी’ मालिका या वाहिनीवर ३.६ रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. तर, या पाठोपाठ ‘लक्ष्मी निवास’ मालिका दुसऱ्या स्थानी आहे. यानंतर अनुक्रमे ‘पारू’, ‘देवमाणूस’, ‘शिवा’ ( मालिका संपली ) या मालिकांचा क्रमांक लागतो.

‘झी मराठी’ वाहिनीच्या आगामी आठवड्याच्या टीआरपीमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कारण, तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका या आठवड्यात ऑन एअर झालेली आहे. तेजश्रीच्या आतापर्यंतच्या सगळ्या मालिका टीआरपी टॉपर ठरल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात टीआरपीच्या आकडेवारीत मोठा बदल होईल.