Star Pravah Thoda Tuza Ani Thoda Maza Serial Off Air : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने काही दिवसांपूर्वीच ‘नशीबवान’ या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांबरोबर शेअर केला. यामध्ये लोकप्रिय अभिनेते अजय पूरकर आणि अभिनेत्री नेहा नाईक यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. याशिवाय ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता केळकर सुद्धा ‘नशीबवान’मध्ये झळकणार आहेत. आता नवीन मालिका सुरू होणार म्हटल्यावर वाहिनीवरील कोणती जुनी सिरियल प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या.
येत्या काही दिवसांत ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर जवळपास १४ महिने अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. या मालिकेचं नाव आहे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका गेल्यावर्षी १७ जून २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वेचं अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक असल्याने या मालिकेची सर्वत्र विशेष चर्चा झाली. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. येत्या २५ ऑगस्टला या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस असेल. याबाबत वाहिनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेला गेल्या १४ महिन्यांत टीआरपी सुद्धा चांगला मिळाला होता. शिवानीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या मालिकेने सुरुवातीपासून कायम टॉप-५ मध्ये आपली जागा निर्माण केली होती. याशिवाय शिवानी आणि समीर परांजपे यांची फ्रेश जोडी सुद्धा प्रेक्षकांना खूपच आवडली.
शिवानी सुर्वेच्या मालिकेचं कथानक गेल्या काही दिवसांपासून अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. आता लवकरच रणजितचं सत्य सुद्धा सर्वांसमोर उघड होणार आहे. याचदरम्यान मानसी तिच्या गायत्री वहिनींना रणजितने सांगितलेल्या गोष्टी जर खऱ्या असतील तर, तुम्ही माझं आजवर कधीही न पाहिलेलं रुप बघाल अशी सक्त ताकीद देणार आहे.
दरम्यान, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका रोज रात्री ९ वाजताच्या स्लॉटला प्रसारित केली जाते. त्यामुळे आता ही मालिका बंद झाल्यानंतर रात्री ९ वाजता कोणती मालिका प्रसारित होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.