Star Pravah Serial Promo : टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी सध्या छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही वाहिन्यांवर नव्या मालिका सुरू होणार आहेत, तर काही मालिकांमध्ये नवनवीन खुलासे होतील. गेल्या काही महिन्यांमध्ये कथानकात आणखी ट्विस्ट आणण्यासाठी दोन मालिकांचे महासंगम घडवून आणले जातात असं पाहायला मिळालं आहे.

मात्र, आता दोन नव्हे तर येत्या आठवड्यात ‘स्टार प्रवाह’वर आठवडाभर तीन मालिकांचा महासंगम पाहायला मिळेल. तीन मालिकांचा महासंगम असल्याने सलग दीड तास प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आणि अर्थातच टीआरपीसाठी हा मोठा ट्विस्ट आणला गेला आहे. या महासंगममध्ये सध्या गाजणाऱ्या ‘ठरलं तर मग’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ आणि ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या तीन मालिकांचा समावेश असले.

‘ठरलं तर मग’ मालिका गेली अडीच वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे. नुकताच मालिकेत वात्सल्य आश्रमाचा निकाल लागला. पण, अजूनही खरी तन्वी कोण आहे याचं सत्य सुभेदारांसमोर आलेलं नाही. महासंगम विशेष भागात खऱ्या तन्वीचं सत्य उघड होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या शिवानी सुर्वेच्या मालिकेत मोठं रहस्य सर्वांसमोर येईल. गायत्रीचा भूतकाळ नेमका काय आहे? ती प्रभूंचा का तिरस्कार करतेय या रहस्याचं गुपित मालिकेत उलगडण्याची शक्यता आहे.

तर, अद्वैत-कला यांच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत कलाच्या हाती राहुलच्या विरोधात मोठा पुरावा लागेल यामुळे खोटेपणाचा पर्दाफाश होण्यास मदत होईल.

अशाप्रकारे एका मालिकेत खोटेपणाचा पर्दाफाश होईल ( लक्ष्मीच्या पाऊलांनी ), दुसऱ्या मालिकेत रहस्य समोर येईल ( थोडं तुझं आणि थोडं माझं ) आणि तिसऱ्या मालिकेत ( ठरलं तर मग ) सर्वांसमोर सत्य उघड होईल, आता हे तीन महाखुलासे नेमके काय असतील याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

११ ते १५ ऑगस्ट या दरम्यान दररोज रात्री ८:३० ते १० वाजेपर्यंत सलग दीड तास प्रेक्षकांना ‘ठरलं तर मग’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ तसेच ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या तीन मालिकांचा महासंगम पाहायला मिळेल.