Subodh Bhave New Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या ११ ऑगस्टपासून ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. सुबोध या मालिकेत समर राजवाडे ही भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊयात…

सुबोध भावेने यापूर्वी ‘झी मराठी’च्या अनेक मालिकांमध्ये काम केलेलं आहे. ‘वादळवाट’, ‘कुलवधू’, ‘अवंतिका’, ‘तुला पाहते रे’, ‘बस बाई बस’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून सुबोधने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली आहे. सुबोधच्या कमबॅकसाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

समर राजवाडे ही नवीन भूमिका आणि नव्या मालिकेबद्दल सांगताना सुबोध भावे म्हणाला, “झी मराठी आणि माझं नातं खूप कमालीचं आहे, आतापर्यंत जवळपास मी झी मराठीच्या १८ ते २० मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रत्येक मालिकेमुळे मला भरभरून प्रेम मिळालं. माझे सहकलाकार, लेखक, दिग्दर्शक, टीम यांचंही मला कायम सहकार्य लाभलं. ‘तुला पाहते रे’ या मालिकेनंतर जवळपास ६ वर्षांनी मी पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर दिसणार आहे त्यामुळे उत्सुकता आहे. समरची भूमिका माझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तो वयाच्या पंचेचाळीशीत आहे, त्याचं लग्नही झालेलं नाहीये.”

सुबोध पुढे म्हणाला, “आता समरला लग्न करायचं नाहीये वगैरे असं काहीच नाही, पण आता त्याची इच्छा राहिली नाहीये. खूप आनंदी-फ्रेश व्यक्तिरेखा आहे आणि ती निभावताना मला वाटतंय की प्रेक्षकांनाही माझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. मला जेव्हा चंद्रांकांत गायकवाड, कल्याणी पाठारे आणि हेमंत यांचा कॉल आला तेव्हा उत्सुकता होतीच, माझ्या वयाची भूमिका आहे, मालिका चांगली आहे सगळं माहिती होतं. पण, प्रोमोमध्ये नक्की काय होणार आहे हे माहीत नव्हतं. तेजश्री आणि मी याआधी एक सिनेमा केला होता. त्यावेळी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला पण, आता या मालिकेच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहोत.”

समर राजवाडेच्या काही विशेष सवयी…

“आमच्या मालिकेच्या प्रोमोला तुफान प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळेच आता मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मला कायम आनंद वाटतो जेव्हा गोष्टी बारकाईने दाखवल्या जातात आणि त्यावर काम करायला मिळतं. मालिका आणि व्यतिरेखा गाजण्यासाठी लेखन महत्वाचं आहे आणि आमच्या दोन्ही लेखिकाही फार कमालीच्या आहेत. मला लग्नाच्या प्रोमोचा एक किस्सा सांगायला आवडेल. गुलाबजामून खायचा सीन होता आणि तेजश्रीने मला गुलाबजामून दाखवून खाल्ला तेव्हा मला खूप राग आला. समरपेक्षा जास्त सुबोधला राग आला असं म्हणायला हरकत नाही. कारण, गुलाबजामून ही माझी कमजोरी आहे, माझा आवडता पदार्थ आहे. पण लग्नाचा प्रोमो शूट करताना खूप मजा आली. समर राजवाडेच्या काही विशेष सवयी आहेत त्याला OCD आहे असं म्हणू शकतो, तसं मलाही स्वछता आवडते पण समर थोडा जास्त बारकाईने गोष्टी बघतो. मला समर राजवाडे ही व्यक्तिरेखा खूप आवडायला लागली आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना छान प्रेमकथा पाहायला मिळणार आहे.” असं सुबोध भावेने सांगितलं.