Subodh Bhave talks About late Priya Marathe : प्रिया मराठे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. ३१ ऑगस्ट रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. प्रियाच्या निधनानंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळींनी तिच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. अशातच तिचा चुलतभाऊ अभिनेता सुबोध भावेनेही प्रियाबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला असून तिचं भरभरून कौतुक केलं आहे.
सुबोध भावेने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याला प्रियाबरोबरच्या आठवणींबद्दल विचारण्यात आलेलं. प्रिया मराठे सुबोध भावेची चुलतबहीण होती. त्याबद्दल त्याने प्रियाच्या निधनानंतर शेअर केलेल्या पोस्टमधून सांगितलेलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुबोधने प्रियाबरोबर काम करतानाच्या, तसेच तिच्या कुटुंबाबरोबरच्या आठवणी सांगितल्या आहेत.
सुबोध भावेची प्रतिक्रिया
प्रिया मराठेबद्दल सुबोध भावे म्हणाला, “प्रियाचं असं अकस्मात निघून जाणं भयंकर धक्कादायक आहे. आम्हा सगळ्यांसाठी तर ते धक्कादायक आहेच; पण तिची आई, तिचा नवरा शंतनू आणि तिचा मोठा भाऊ विवेक यांच्यासाठी जास्त धक्कादायक आहे. कारण- तिचा त्यांच्याबरोबर सर्वांत जास्त सहवास होता. दुर्दैवाने तिचे वडील म्हणजे माझा काका प्रिया लहान असतानाच गेला. तोपण खूप छान होता. सुहास त्याचं नाव होतं. आम्ही त्याला सुहासकाका म्हणायचो. तो आमच्या घरी आल्यानंतर वातावरण एकदम छान असायचं. तो खूप खेळकर आणि उत्साही होता. त्याने अनेक व्यवसाय केले. ठाण्यात त्याने प्रियाच्याच नावाने प्रिया कॉफी हाऊस हा एक व्यवसाय सुरू केला होता. तो खूप आनंदाने आयुष्य जगायचा आणि मला असं वाटतं की, त्याच्यातले बरीच गुण प्रियामध्ये आले होते. मी सुहासकाकांबद्दल सांगितले; कारण प्रिया स्वभावाने अगदी त्याच्यासारखीच होती.”
तिचा भाऊ म्हणून मला तिचा प्रचंड अभिमान आहे – सुबोध भावे
सुबोध बहिणीबद्दल पुढे म्हणाला, “ती माझ्यापेक्षा १२ वर्षांनी लहान होती. तिचा मोठा भाऊ विवेक आणि मी आम्ही एकाच वयाचे आहोत आणि शाळेत एकत्र असताना खूप मस्ती करायचो. तेव्हा प्रियाचा जन्म झाला नव्हता; पण ती लहानपणापासूनच खूप हसरी, खूप चांगली आणि माणसांमध्ये रमणारी होती. प्रत्येकाशी खूप प्रेमाने वागायची. जो माणूस तिच्या आयुष्यात आला, तो तिच्यापासून कधीच दूर गेला नाही. तिचा भाऊ म्हणून, तिचा सहकलाकार म्हणून मला तिचा प्रचंड अभिमान आहे. या संपूर्ण आजारपणाच्या काळात माझी काकू आणि शंतनू यांनी तिला खूप जपलं, खूप सांभाळलं.”
सुबोध भावे प्रियाबरोबर काम करतानाचे अनुभव सांगत म्हणाला, “माझ्या नशिबानं मला चार कामं तिच्याबरोबर करता आली. आमच्या दोघांच्या पहिल्या मालिकेत ‘कळत नकळत’मध्ये मी तिच्याशी वाईट वागून तिला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतो आणि फसवतो वगैरे असे आम्ही सीन केले. जेव्हा ती पहिल्यांदा मालिकेच्या सेटवर मला भेटली तेव्हा मी म्हटलं की, प्रिया तू का ही भूमिका स्वीकारली? जरी आपण आपलं नातं विसरून काम केलं तरीसुद्धा तुझ्याबरोबर मला खूप वाईट वागायचं आहे स्क्रीनवर. तर तेव्हा ती माझ्यापेक्षाही लहान असताना म्हणाली की, दादा आपलं काम आपण चोखपणे करूयात. आपलं भावा-बहिणीचं नातं विसरून भूमिका साकारूयात. तेव्हा तिचं ते बोलणं ऐकून म्हटलं की, अरे वा! पहिल्याच मालिकेत ती इतकी समजूतदार होती.”
मराठी इंडस्ट्रीनं प्रियाची दखल घेतली नाही – सुबोध भावे
सुबोध पुढे म्हणाला, “त्यानंतर आम्ही ‘किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी’ या चित्रपटात काम केलं. त्याच्यात प्रिया माझी बायको होती. त्यानंतर आम्ही ‘ती आणि इतर’ या चित्रपटात काम केलं. त्यानिमित्त आम्ही ७-८ दिवस एकत्र काम केलं आणि मग आता ‘तू भेटशी नव्याने’मध्ये आम्ही एकत्र काम केलं. त्यात ती माझ्या मागे असते. तिनं त्यात खलनायिकेची भूमिका साकारलेली. तेव्हा मला तिला बघून आनंद झाला की, तिला कर्करोग झाल्यानंतर त्यावर मात करीत तिनं पुन्हा कामाला सुरुवात केली. तिनं नाटकांचे प्रयोग केले. मला असं वाटतं की, मराठी इंडस्ट्रीनं म्हणजे चित्रपटसृष्टीनं प्रियाची हवी तेवढी दखल घेतली नाही. ती खूप सुंदर आणि गुणी होती.”
सुबोध पुढे म्हणाला, “‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या सेटवरच गेल्यानंतर एक दिवस समजलं की, आता प्रिया मालिकेत काम करीत नाहीये. कारण- तिला पुन्हा त्रास सुरू झालेला. मध्ये मध्ये मी तिला मेसेज आणि फोन करीत होतो; पण तिनं भेटू नाही दिलं कधी कोणाला. मला असं वाटतं की, तिला इच्छा नसेल की, या अवस्थेत तिच्या जवळच्या माणसांनी तिला पाहावं; पण शंतनूशी आम्ही संपर्कात होतो. प्रियाला मेसेज करायचो; पण ती नीट उत्तरं द्यायची नाही. तेव्हा मला लक्षात आलं की, कदाचित तिला तिच्या आजाराविषयी फार बोलायचं नसेल. त्याचं रडगाणंही ती कधी गायली नाही. मला वाटलेलं की, तिचा पुन्हा फोन येईल आणि म्हणेल की, दादा मी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे; पण तसं काही झालं नाही आणि शेवटी कर्करोगानं तिचा घास घेतला.”