Marathi Serial Constable Manju Off Air : ‘स्टार प्रवाह’ आणि ‘झी मराठी’ वाहिनीवरील विविध मालिकांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. मात्र, या टीआरपीच्या स्पर्धेच्या युगात ‘सन मराठी’च्या ‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेने स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. ‘स्टार प्रवाह’वरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ तसेच शिवानी सुर्वेची ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिका नुकत्याच ऑफ एअर करण्यात आल्या. मात्र, या दोन मालिकांपाठोपाठ घरोघरी पाहिल्या जाणाऱ्या ‘कॉन्स्टेबल मंजू’ या लोकप्रिय मालिकेने सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

‘कॉन्स्टेबल मंजू’ ही लोकप्रिय मालिका गेल्यावर्षी १८ मार्च २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता जवळपास दीड वर्षांनी या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला आहे. एवढ्या लवकर ही लोकप्रिय मालिका संपेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांना सुद्धा मोठा धक्का बसला आहे.

‘कॉन्स्टेबल मंजू’ या मालिकेत अभिनेत्री मोनिका राठी आणि विशाल कदम यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याशिवाय मिलिंद जोशी, कल्याणी चौधरी, विद्या सावळे, विद्या यांच्या दोन मुली नेहा-निकिता, शिवराज नाळे, अजय तपकिरे हे कलाकार सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते. जवळपास दीड वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर आता या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला आहे.

अजय तपकिरे यांनी, “दीड-दोन वर्षांचा प्रवास काल अखेर संपला…गुडबाय ‘कॉन्स्टेबल मंजू” अशी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यावर त्यांनी “सोडूनी गोकुळास बा रे,चाललास जा रे मथुरेचं दान पावू दे” हे गाणं लावलं आहे.

‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नव्हती. मात्र, तरीही या शोला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. नेटकरी कमेंट्समध्ये म्हणतात, “मालिका का बंद करताय? चांगल्या बातम्या बंद करायची काय गरज”, “मंजुची मालिका प्लीज बंद करू नका”, “थोडक्यात शेवट झाला” अशा बऱ्याच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.

दरम्यान, ‘कॉन्स्टेबल मंजू’ ही मालिका रात्री ८ वाजता सन मराठी वाहिनीवर प्रसारित केली जायची. सगळेच प्रेक्षक या मालिकेला खूप मिस करणार आहेत.