Swara Bhasker gets emotional: बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असते. सडेतोड, स्पष्ट वक्तव्यांसाठी ती ओळखली जाते. तिच्या काही ट्विट्समुळे ती अनेकदा ट्रोलदेखील होते.
गेल्या काही दिवसांपासून स्वरा भास्कर पती फहाद अहमदबरोबर कलर्स टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘पती पत्नी और पंगा’ या शोमध्ये सहभागी झाली आहेत. या शोमध्ये स्वरा व फहादसह रुबिना दिलैक व पती अभिनव शुक्ला, हिना खान व रॉकी जैस्वाल, देबीना बॅनर्जी व गुरमित चौधरी, अविका गौर आणि मिलिंद चंदवानी, ममता व सुदेश लहरी अशी काही सेलिब्रिटी जोडपी पाहायला मिळत आहेत.
या शोमध्ये कधी पती व पत्नी यांच्यामध्ये तर कधी जोडप्यांमध्ये विविध टास्क रंगताना दिसतात. अनेकदा या शोमध्ये हे कलाकार त्यांच्या खासगी आयुष्यातील खास क्षणांबद्दल व्यक्त होताना दिसतात. कठीण काळात त्यांच्या जोडीदाराने त्यांना कशी साथ दिली याबद्दल ते सांगतात. अनेकदा आनंदाचे, दु:खाचे, काही गमतीजमती घडल्याचे प्रसंग शेअर करतात.
आता या शोमध्ये सगळ्या अभिनेत्रींच्या सासूंनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी त्यांच्या सुनेबद्दल वक्तव्य केले आहे, त्यामुळे अभिनेत्रींची एक वेगळी बाजू पाहायला मिळत आहे.
स्वरा भास्करची सासू म्हणजे फहाद अहमदच्या आईने स्वराबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर स्वराच्या डोळ्यात अश्रू आल्याचे पाहायला मिळत आहे. कलर्स टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये फहाद अहमद म्हणतो की, माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुखाची गोष्ट ही आहे. माझ्या आईचे आणि माझ्या पत्नीचे नाते खूप उत्तम आहे.
“ती आमच्या संपूर्ण कुटुंबावर…”
फहादची आई म्हणाल्या, “तू तुझ्या आईला फोन करत नाहीस, आईबरोबर सतत बोलत नाहीस, असे म्हणून स्वरा फहादबरोबर खूप भांडण करते. ती आमच्या संपूर्ण कुटुंबावर खूप लक्ष देते. संपूर्ण बरेलीमध्ये मी अशी सून पाहिली नाही. मी विचारही केला नव्हता की मला इतकी चांगली सून मिळेल. स्वरा खूप चांगली आहे, कुटुंबाबरोबर ती खूप आनंदी राहते.”
पुढे त्या म्हणाल्या, “असे नाही की मी हे टीव्हीवर दाखवत आहे म्हणून बोलत आहे. हे सत्य आहे की मला सून खूप चांगली मिळाली आहे”, सासूने कौतुक केल्यानंतर स्वराच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत आहेत; तर तिच्या पतीसह इतरांनीदेखील टाळ्या वाजवत तिचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनीदेखील सासू सुनेमधील नात्याचे कौतुक केले आहे. स्वरा तू आमची मने जिंकलीस, असेही अनेकांनी म्हटले आहे. दरम्यान, आता पती, पत्नी और पंगा या शोमध्ये पुढे काय घडणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.