Actress Simple Kaul Divorce : मराठी गायक राहुल देशपांडे यांनी नुकतीच घटस्फोटाची घोषणा केली आहे. राहुल व नेहा वर्षभरापूर्वी कायदेशिररित्या विभक्त झाले. त्यानंतर आता एका अभिनेत्रीच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री सिंपल कौलने घटस्फोटासाठी अर्ज केल्याची माहिती दिली आहे.
‘शरारत’ व ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री सिंपल कौलचा १५ वर्षांचा संसार मोडला आहे. सिंपल पती राहुल लुंबापासून घटस्फोट घेत आहे. तिने कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. घटस्फोटाचा निर्णय परस्पर सहमतीने घेतल्याचं तिने सांगितलं.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये सिंपल कौलने जेठालालची पहिली पत्नी गुलाबोची भूमिका साकारली होती. या शोमध्ये तिला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं. शोमधील सिंपलचे व्हिडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
१५ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय
सिंपलने २०१० मध्ये राहुल लुंबाशी लग्न केलं होतं. लग्नानंतर १५ वर्षांनंतर या जोडप्याने वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे. स्वतः सिंपलनेच यासंदर्भात माहिती दिली आहे. परस्पर सहमतीने विभक्त व्हायचा निर्णय घेतला आहे, असं सिंपलने इ-टाइम्सशी बोलताना सांगितलं. घटस्फोटाचा निर्णय घेण्यासाठी दोघेही परिपक्व असल्याचं तिने म्हटलं आहे.
सगळं संपलेलं नाही – सिंपल कौल
सिंपल म्हणाली, “आम्ही अजूनही कुटुंब आहोत. मला असं वाटत नाही की सगळं संपलं आहे, कारण मी या व्यक्तीला वर्षानुवर्षे ओळखते. जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, सर्वकाही अगदी तसेच राहते. मला माहित नाही की लोक कसे वेगळे होतात. मी प्रेमाने जगते आणि मी माझ्या आयुष्यात खूप प्रेमाने, खूप आनंदाने राहते. मी असंच आयुष्य जगते.”
सिंपल कौरने घटस्फोटाचं कारण सांगितलं नाही. २०२३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत पतीबरोबर लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असल्याचं सिंपलने म्हटलं होतं. पतीची फार आठवण येते, त्याचा जास्तीत जास्त वेळ परदेशात जातो, असंही सिंपलने सांगितलं होतं.
“मला त्याची खूप आठवण येते. पण आम्ही एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतो, त्यामुळे आमचं नातं खूप घट्ट आहे. जेव्हा तो घरापासून दूर असतो तेव्हा मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करते. म्हणूनच आमच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात संतुलन आहे आणि आम्ही आनंदी आहोत,” असं सिंपल कौल म्हणाली होती.