‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या शोमधील व्यक्तीरेखाही तेवढ्याच लोकप्रिय आहेत. जवळपास १३ वर्षे सुरू असलेल्या या शोमध्ये जेठालाल, दयाबेन, बापूजी, टप्पू यांसारख्या व्यक्तिरेखांचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. पण जेव्हापासून दयाबेन म्हणजे दिशा वकानी शो सोडला आहे तेव्हापासून शोची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे. २०१७ मध्ये दिशा वकानीने शो सोडला होता. तेव्हापासून चाहते आणि प्रेक्षकांना ती शोमध्ये कधी परतणार याची वाट पाहत आहेत. दरम्यानच्या काळात अभिनेत्री काजल पिसाळने दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. तिची या भूमिकेसाठी निवड झाली नाही. पण या ऑडिशनचा फटका तिच्या करिअरला बसल्याचं तिचं म्हणणं आहे.
काजल पिसाळच्या म्हणण्यानुसार, दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिल्यानंतर तिला अन्य शोसाठी विचारणा झाली नाही. काजल पिसाळ अखेरची ‘सिर्फ तुम’ या टीव्ही मालिकेत दिसली होती. ही मालिका बंद झाली. तेव्हापासून काजलकडे दुसरा कोणताच नवा प्रोजेक्ट नाही. ती नव्या कामासाठी प्रयत्न करत आहे मात्र तिला अद्याप कोणताही नवा प्रोजेक्ट मिळालेला नाही.
‘ई-टाइम्स’शी बोलताना काजल पिसाळ म्हणाली, “मी दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडिशन दिली होती पण बरेच दिवस वाट पाहूनही मला त्यांचा कॉल आला नाही. नंतर मला समजलं की माझं सिलेक्शन झालेलं नाही. पण काही प्रॉडक्शन हाऊसना असं वाटतंय की मी दयाबेनची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे मला नव्या प्रोजेक्ट्ससाठी कोणीच विचारणा करत नाही. मी ऑगस्टमध्ये या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. मी याआधी त्याबद्दल बोलले नाही कारण मी फक्त ऑडिशन दिली होती. मी वाट पाहत राहिले की मेकर्स काहीतरी बोलतील पण त्यांच्याकडून मला कॉल आला नाही.”
काजल पिसाळ पुढे म्हणाली, “पण प्रोडक्शन हाऊस आणि कास्टिंग डायरेक्टर्सना वाटतं की मी ‘तारक मेहता’मध्ये दयाबेनची भूमिका करणार आहे, त्यामुळे ते कामासाठी मला विचारणा करत नाहीत. त्यांनी मला फोन करून विचारले की मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ साइन केला आहे का? तेव्हा मला हे सर्व समजलं. त्यामुळे मला हे स्पष्ट करायचे आहे की ऑडिशन देऊनही ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या निर्मात्यांनी मला संपर्क केला नाही. या ऑडिशनचा माझ्या करिअरला फटका बसला आहे.”
आणखी वाचा- ‘तारक मेहता…’ मालिकेतील ‘या’ फोटोमध्ये आहेत पाच फरक, बघा तुम्हाला येतात का ओळखता?
काजल पिसाळने तिच्या करिअरची सुरुवात २००७ मध्ये केली होती. ‘कुछ इस तरह’ ही तिची पहिली टीव्ही मालिका होती. त्यानंतर ती ‘सीआयडी’, ‘अदालत’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘एक हजारों में मेरी बहना है’ आणि ‘एक मुठ्ठी आसमान’ यांसारख्या शोमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती एकता कपूरच्या ‘नागिन ५’मध्येही दिसली होती.