Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Actor Dilip Joshi Talk’s About His Marriage : अभिनेते दिलीप जोशी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील त्यांच्या जेठालाल या भूमिकेने जणू प्रेक्षकांच्या मनामध्ये कायमचं घर केलं आहे. त्यांनी या मालिकेतून त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे व्यावसायिक आयुष्यामुळे ते कायमच चर्चेत राहतात. परंतु, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं.
दिलीप जोशी गेली १७ वर्षे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय कार्यक्रमात मुख्य भूमिका साकारत आहेत. या मालिकेचा देशभरात मोठा चाहतावर्ग आहे. नुकताच मालिकेच्या टीमनं मालिकेला १७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करीत आनंद साजरा केला. यावेळी दिलीप यांच्या कुटुंबीयानीसुद्धा हजेरी लावली होती. त्यांचे आई-वडील दोघेही यावेळी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
दिलीप जोशी यांचा बालविवाह होता?
दिलीप यांनी काही दिवसांपूर्वी ‘मॅशेबल इंडिया’ला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. त्यामध्ये दिलीप जोशींनी त्यांचा जवळ जवळ बालविवाहसारखं लग्न झाल्याचं म्हटलं आहे. दिलीप जोशी मुलाखतीमध्ये त्यांच्या लग्नाबद्दल सांगताना म्हणाले, “माझी बायको १४ वर्षांची होती आणि मी १८ वर्षांचा होतो तेव्हा आमचा साखरपुडा झालेला. नंतर ती १८ वर्षांची झाली आणि मी २२ वर्षांचा झालो तेव्हा आमचं लग्न झालं. त्यामुळे आमची बालविवाहसारखी गोष्ट आहे.”
दिलीप जोशी यांचं जयमाला जोशी यांच्याशी लग्न झालं. या दोघांना एक मुलगी व मुलगा, अशी दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं लग्न झालं असून, त्यावेळी त्यांच्या लेकीच्या लग्नातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
दिलीप जोशी पुढे म्हणाले, “मी मुलांच्या शाळेत होतो. तिथे मुली नसायच्या. त्यामुळे मला त्यांच्याशी बोलण्याची सवय नव्हती आणि मुलींशी बोलताना मला भीती वाटायची.” दिलीप जोशी क्वचितच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसतात. टीव्हीवरील मालिकेमुळे जरी ते रोज प्रेक्षकांच्या संपर्कात असले तरी सोशल मीडियावर मात्र ते फार कमी सक्रिय असल्याचे दिसते.