TMKOC fame actress on comeback of Disha Vakani: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल येणे असो वा मालिका सोडलेल्या कलाकारांनी शोबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे या कार्यक्रमाची मोठी चर्चा होताना दिसत आहे.

गेल्या १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणून तारक मेहता का उल्टा चश्मा या शोची ओळख आहे. मागच्या काही वर्षांत या मालिकेत कलाकारांनी हा शो सोडला आहे. काही कलाकारांना शोमधून काढले आहे. त्यापैकी जेनिफर मिस्त्री बन्सिवाल ही अभिनेत्री आहे.

अभिनेत्रीने याआधी दिलेल्या मुलाखतीत गरोदरपणात ब्रेक घेतला होता. त्यानंतर शोमध्ये परत घ्या, म्हणून मी निर्मात्यांच्या हाता-पाया पडले, पण त्यांनी मला घेतले नाही. पण, दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानीला परत घेण्यासाठी निर्मात्यांनी तिची विनवणी केली होती, तिच्या हातापाया पडले होते, असा खुलासा अभिनेत्रीने केला होता. तर असित मोदींवर गंभीर आरोपदेखील केले होते.

जेनिफर मिस्त्री बन्सिवाल नेमकं काय म्हणाली?

आता अभिनेत्रीने नुकतीच ‘फिल्मीग्यान’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत दिशा शोमध्ये परतणार का, यावर तिने तिचे मत सांगितले.

अभिनेत्री म्हणाली, “दिशाला परत शोमध्ये आणण्यासाठी असित मोदी खूप प्रयत्न करतील. पण, दिशा कदाचित येणार नाही. त्यांनी याआधीसुद्धा दिशाला पुन्हा शोमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता त्यांच्यात काय समस्या आहेत, हे मला माहित नाही. दिशा शोमध्ये परत का आली नाही, हे मला माहित नाही. कदाचित, ती तिच्या कुटुंबामध्ये व्यग्र आहे. मुलांकडे लक्ष देत आहे, ते कारण असू शकते.”

“मात्र दिशाला परत आणण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील. कारण- २०१७ पासून दिशा शोमध्ये नाही. तिच्याऐवजी इतर कोणी अभिनेत्री आली नाही. दयाबेनचे पात्र साकारणे, खूप मोठी जबाबदारी आहे. दिशाने असे काम केले आहे, तिच्याऐवजी इतर कोणाला घेणे अवघड आहे.

याच मुलाखतीत अभिनेत्रीने जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यात मोठे भांडण झाले होते, असाही खुलासा केला.

दरम्यान, जेनिफर मिस्त्री बन्सिवालने ‘तारक मेहता उल्टा चश्मा’ मालिकेत रोशन ही भूमिका साकारली होती. २०२५ मध्ये या मालिकेला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने मालिकेतील सर्व कलाकारांनी एकत्र आनंद साजरा केला होता.