TMKOC fame Sonalika Joshi: भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम सोनालिका जोशी म्हणाल्या, “ते दोघे दिसायला…”

‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ ही मालिका गेली १७ वर्षे अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या विनोदी कार्यक्रमाला १७ वर्षे प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मालिकेतील जेठालाल, अय्यर, बबिता, मेहता साहब, अंजली भाभी, हाथी भाई, डॉक्टर कोमल, बापूजी, भिडे मास्तर, माधवी भाभी, पोपटलाल, बाघा, टपू सेना अशी मालिकेतील अनेक पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील प्रत्येक पात्राची एक खासियत आहे. त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे आता जेठालालपासून पोपटलालपर्यंत मालिकेतील सर्व पात्रांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

आता मालिकेत माधवी भाभी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सोनालिका जोशी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मालिकेतील पती म्हणजेच भिडे मास्तर आणि त्यांचे खऱ्या आयुष्यातील पती समीर जोशी यांच्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांच्यात काय साम्य आहे, यावरही त्यांनी वक्तव्य केले आहे.

सोनालिका जोशींनी नुकतीच सुमन मराठी म्युझिक या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना असे विचारले की, जसे मालिकेत भिडे मास्तर आणि माधवी भाभी हे जोडपे आहे, त्यांच्यासारखे सोनालिका आणि समीर जोशी हे जोडपे आहे का? याचे काही अनुभव तुला आलेत का? त्यावर सोनालिका जोशी म्हणाल्या, “मालिकेत जसा भिडे शिस्तप्रिय आहे, तसाच समीरसुद्धा आहे. भिडे सारखंच समीरचंदेखील असं असतं की फार पैसे खर्च करायचे नाहीत. या वस्तू कशाला वगैरे, असे समीरचे अजूनही प्रश्न असतात. मी त्याला म्हणते मी कमवते ना, मला खर्च करू दे. मग तो मला म्हणतो, त्याची काही गरज आहे का? तर तो अगदी भिडे सारखाच आहे. पण, तो सीए म्हणून काम करतो, तर ते त्याच्या रक्तातच आहे.”

सोनालिका जोशी म्हणाल्या, “ते दोघे दिसायलासुद्धा सारखेच आहेत. कपाळ मोठं, थोडे कमी केस तर त्या दोघांचं व्यक्तिमत्त्व सारखं आहे. तर आम्ही बाहेर गेलो की लोक समीरला भिडे म्हणतात. मग असंही म्हणतात की नाही, तो नाही, काही जण म्हणतात तो तसाच दिसतो, अशा लोकांच्या चर्चा रंगलेल्या दिसतात.”

पुढे सोनालिका जोशींनी एक किस्सादेखील सांगितला. त्या एका मुलाखतीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचे पती समीर जोशी आणि भिडेची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर त्यांच्याबरोबर होते. अभिनेत्री म्हणाली, “त्या मुलाखतीत असा विचारलं की मालिकेतील तुमच्या नवऱ्याला आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला दोघांनाही कमी केस आहेत. तर याचं कारण तुम्ही आहात का?” तर अशी गंमत जंमत होते. लोक अनेकदा समीरला भिडे समजतात”, अशी आठवण सांगत मालिकेतील रील आणि रिअल नवऱ्याबाबत वक्तव्य केले.