Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame Mandar Chandwadkar: टेलिव्हिजनवर अधिराज्य गाजवणाऱ्या लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणून तारक मेहता का उल्टा चश्मा या कार्यक्रमाची ओळख आहे. २००८ साली या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती.
२००८ पासून या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकेचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीतदेखील हा शो नेहमीच वरच्या स्थानावर असल्याचे दिसते. आता दोन आठवड्यांपूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ने पहिल्या क्रमांकावर बाजी मारली होती.
विशेष म्हणजे रूपाली गांगुलीची प्रमुख भूमिका असलेली ‘अनुपमा’ ही स्टार प्लसवरची मालिका बऱ्याच काळापासून पहिल्या नंबरवर होती. या मालिकेला मागे सारत ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ने टीआरपीमध्ये पहिला क्रमांक मिळवला.
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ने टीआरपीमध्ये पहिला क्रमांक
टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ने बाजी मारल्यानंतर या मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे या भूमिकेत दिसणारे मंदार चांदवडकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला.
या व्हिडीओमध्ये ते चाहत्यांना उद्देशून म्हणाले होते, ” ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने टीआरपी चार्टवर अव्वल स्थान पटकावले आहे, म्हणून मी आज हा व्हिडीओ बनवत आहे. मी आणि मालिकेची संपूर्ण टीम खूप आनंदी आहे. तुमच्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले आहे. गेल्या १७ वर्षांपासून तुम्ही आमच्यावर बिनशर्त प्रेमाचा वर्षाव करीत आहात. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.”
महत्त्वाची बाब म्हणजे या आठवड्यातही तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आता मंदार चांदवडकर यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत टीआरपी सातत्याने वरच्या क्रमांकावर असण्याचे कारण सांगितले आहे.
“आमच्या मालिकेला १७ वर्षे पूर्ण…”
अभिनेते म्हणाले, “१७ वर्षांनंतरही आम्हाला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे, याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. सुरुवातीला प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळत होते, तसेच ते आजही मिळत आहे. टीआरपीच्या बाबतीत हा शो अजूनही चांगला कामगिरी करीत आहे आणि ही एक मोठी कामगिरी आहे.
“आमच्या मालिकेला १७ वर्षे पूर्ण होत आहेत. १८ व्या वर्षात आम्ही पाऊल ठेवत आहोत. हा अविश्वसनीय टप्पा गाठल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करू इच्छितो.
“गेल्या काही वर्षांत अनेक लोक आले आणि गेले; परंतु या शोने त्याचे स्थान टिकवून ठेवले आहे. त्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे आमचे निर्माते असित कुमार मोदी आहेत. ते अजूनही दररोज लेखकांसोबत बसतात, प्रत्येक कथा आणि प्रत्येक पात्रावर जवळून काम करतात. यश मिळवणे सोपे आहे; पण ते टिकवून ठेवणे अवघड आहे आणि असित मोदी तेच करतात. आनंद या गोष्टीचा आहे की, आमचा शो प्रत्येक पFढी बघते. जी लहान मुले आमचा शो बघायची, ती आता मोठी झाली आहेत आणि ते आता त्यांच्या मुलांसह आमची मालिका बघतात. प्रेक्षक आणि मालिकेचे हे जे कनेक्शन आहे, त्याचा आम्हाला आनंद होतो आणि अभिमानही वाटतो.”
“गोकुळधामवासीयांना अडचणीत पाहणे…”
पुढे अभिनेते असेही म्हणाले, “गोकुळधामवासीयांना अडचणीत पाहणे प्रेक्षकांना खूप आवडते. भूतनीचे एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर चाहते त्यावर रील आणि मिम्स बनवताना दिसत आहेत. सोशल मीडियामुळे आम्हाला प्रेक्षकांकडून या मालिकेबद्दल प्रतिक्रिया मिळतात. सध्या आम्ही भूतनीचे आऊटडोअर शूट करत आहोत. बाहेर शूटिंग करायला मजा येते.
जुन्या एपिसोडबरोबर मालिकेच्या सध्या भागांची होत असलेल्या तुलनेबाबत अभिनेते म्हणाले, “१७ वर्षे एखादा शो चालवणे ही काही छोटी गोष्ट नाही. आजकाल जेव्हा लोक आपले जुने भाग पाहतात तेव्हा ते त्यांची तुलना आपण आता जे करीत आहोत त्याच्याशी करतात. पण, तेव्हा विनोद, परिस्थिती व संदर्भ खूप वेगळे होते आणि आज ते पुन्हा तयार करणे शक्य नाही.
“गेल्या १७ वर्षांत भिडे आणि जेठालालदेखील मोठे झाले आहेत. त्या काळातील विनोदाचा प्रकार त्या काळातील प्रेक्षकांना अनुकूल होता. त्यापैकी बरेच जण लहान मुले होती. ती मुले आता मोठी झाली आहेत आणि त्यामुळे मालिकेतील विनोदही काळाशी जुळवून घेणारे असतात. तुलना होणे स्वाभाविक आहे; आम्ही जाणीवपूर्वक कथानक किंवा ट्रॅकची पुनरावृत्ती टाळतो. प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन असावे, यावर आमचा भर असतो.”
सध्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये भूतनीचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. या ट्रॅकला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. तर, या एपिसोडमध्ये जेठालाल व बबिता न दिसल्याने त्यांनी मालिका सोडली अशा चर्चा झाल्या होत्या. त्यावर निर्माते असित मोदींनी ते आमच्या टीमचा भाग आहेत. त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे ते त्या एपिसोडमध्ये नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. सध्या मालिकेत श्याम पाठक, अमित भट्ट, सोनालिका जोशी, मंदार चांदवडकर, मुनमुन दत्ता, दिलीप जोशी यांसह अनेक कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत.