Jennifer Mistry Bansiwal on TMKOC Makers: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही लोकप्रिय मालिका १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करत आहे. नुकतीच या मालिकेला १७ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने संपूर्ण टीमने एकत्र येत आनंद साजरा केला. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री काय म्हणाली?
गेल्या १७ वर्षांत या मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे. त्यामध्ये दयाबेन ही भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री दिशा वकानीचादेखील समावेश आहे. दिशाने मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र, ती मालिकेत पुन्हा परतलीच नाही. प्रेक्षक आजही दयाबेन मालिकेत परत येईल, याची वाट बघताना दिसतात. मालिकेचे निर्मातेदेखील यावर अनेकदा वक्तव्य करतात.
आता या मालिकेत रोशनभाभीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने नुकतीच पिंकविलाला मुलाखत दिली. जेनिफर मिस्री बन्सीवालने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिशा वकानीबाबत वक्तव्य केले आहे.
अभिनेत्री म्हणाली, “माझ्या गरोदरपणानंतर मला जेव्हा शोमध्ये परत यायचे होते, तेव्हा मी निर्मात्यांच्या हाता-पाय पडले; पण मला पुन्हा शोमध्ये घेतले नाही. मात्र, निर्मात्यांनी दिशासमोर हात जोडून तिला शोमध्ये परत येण्यासाठी विनवणी केली होती. तिच्या गरोदरपणानंतर निर्माते तिच्या हाता-पाया पडले होते. पण, ती परत आली नाही.”
दिशाला शिडी चढण्यास मनाई होती. त्यामुळे जेव्हा वरच्या मजल्यावर शूटिंग असे तेव्हा, स्ट्रेचरसारखे काहीतरी होते, त्यावर ती बसत असे. त्यावरून तिला वरच्या मजल्यावर घेऊन जात असत. त्यानंतर शूटिंग होत असे.
जेनिफर असेही म्हणाली की, दिशाचा स्वभाव असा आहे की, जरी तिला शोच्या निर्मात्यांबरोबर काही समस्या असतील, तरी ती तिच्यापर्यंतच ठेवेल. त्यामुळे तिच्याबरोबर काम करणाऱ्या कलाकारांनादेखील दिशाचे शो सोडण्याचे नेमके कारण माहीत नाही.
दरम्यान, दिशासारख्या अनेक लोकप्रिय कलाकारांनी ही मालिका सोडली असली तरी आजही या कार्यक्रमाचा चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या काही दिवसांत या शोने टीआरपीमध्ये पुन्हा बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.