Taarak Mehta Ka Ooltah Chashmah New Rajasthani Family To Enter Gokuldham Society : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा चाहतावर्गही मोठा आहे. काही न काही कारणांमळे ही मालिका आणि त्यातील कलाकार चर्चेत असतात. अशातच आता याचे निर्माते असित मोदी यांनी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी शेअर केली आहे.
असित मोदी यांनी सोशल मीडियावर या मालिकेत काही नवीन कलाकारांची एन्ट्री होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत याबाबतची माहिती दिली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत या नवीन कुटुंबाबद्दल चर्चा सुरू होती. आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत असित मोदी गोकुलधाम सोसायटीत असून ही आनंदाची बातमी देताना दिसत आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये होणार नवीन कुटुंबाची एन्ट्री
व्हिडीओमध्ये ते म्हणाले, “‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कार्यक्रमावर प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. आज आम्ही ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये शुभकार्याची सुरुवात करीत आहोत. गोकुळधाम सोसायटीत एका नवीन कुटुंबाची एन्ट्री होणार आहे.” त्यानंतर त्यांनी मालिकेतील नवीन कुटुंबाची ओळख करून दिली.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये पाहायला मिळणाऱ्या नवीन कुटुंबात एक जोडपं आणि त्यांची दोन मुलं, असे चार सदस्य आहेत. त्यांच्या मुलीचं नाव बंसरी, मुलाचं वीर, त्यांच्या वडिलांचं रत्नसिंह चतुररसिंह बिंजोला, जो एक व्यापारी असतो आणि त्याचं साड्यांचं दुकान असतं. तर या मुलाच्या आईचं नाव रूपमती असं आहे, जी स्वत:ला सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सर म्हणवताना दिसते.
असित मोदी पुढे म्हणतात, “हे आहे रूपा व रत्न यांचं छोटंस गोड कुटुंब. गोकुळधाम सोसायटीत त्यांचं स्वागत आहे. देवाची कृपा असते तेव्हा प्रेक्षकांचं प्रेम मिळतं आणि तुम्ही प्रेक्षकांनी आमच्यावर खूप प्रेम केलं आहे. आता असंच प्रेम आमच्या या नवीन कुटुंबावरही करा.”
‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत असित मोदींनी याबाबत सांगितलं. ते मालिकेत एन्ट्री करणाऱ्या नवीन राजस्थानी कुटुंबाबद्दल म्हणाले, “गेल्या काही वर्षांत या मालिकेत अनेक कलाकारांची एन्ट्री झाली आणि प्रेक्षकांनीही त्यांचं स्वागत केलं आहे. त्यामुळे गोकुळधाम कुटुंब मोठं होतं गेलं आता यामध्ये राजस्थानी कुटुंबाची एन्ट्री होणार आहे. यामध्ये अभिनेत्री धर्ती भट्ट, कुलदीप गौर आणि बालकलाकार अकशन सेहरावत व माही हे कलाकार पाहायाल मिळणार आहेत.”
गेली १७ वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या मालिकेत आता एका नवीन कुटुंबाची एन्ट्री होणार असून, त्यामधून हे नवीन कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे या नवीन कुटुंबाच्या येण्यानं मालिकेत कोणतं नवीन वळण येणार, तसेच पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.