TMKOC producer Asit Modi shared a video with Dayaben: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेची, त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांची वेळोवेळी चर्चा होताना दिसते. मालिकेतील अनेक संवाद मीम्सच्या स्वरूपात सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
या सगळ्यात मालिकेतील दयाबेन हे पात्र चांगलेच गाजल्याचे पाहायला मिळाले. हे पात्र अभिनेत्री दिशा वकानीने साकारले होते. मात्र, मालिकेत काही वर्षे काम केल्यानंतर अभिनेत्रीने ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती लवकरच परतेल असे म्हटले जात होते, त्यामुळे दयाबेन पुन्हा कधी मालिकेत येणार, अशी प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. मात्र, इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली नाही.
या सगळ्यात मालिकेचे निर्माते असित मोदी यांना दयाबेन कधी परतणार, असे प्रश्न विचारले जातात. तसेच, निर्मात्यांबरोबर काही समस्या असल्याने दिशा वकानी मालिकेत परत येत नसल्याच्या चर्चाही रंगताना दिसतात. आता मात्र एका व्हिडीओमुळे असित मोदी आणि दिशा यांच्यातील नाते उत्तम असल्याचे पाहायला मिळत आहे.
असित मोदींनी दयाबेनची घेतली भेट
आता असित मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य दसत आहेत. त्याबरोबरच दिशा वकानीदेखील दिसत आहे. दिशाने असित मोदींना राखी बांधून त्यांचे औक्षण केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच व्हिडीओमध्ये पुढे ते एकेमकांशी बोलताना, एकत्र हसताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना असित मोदी यांनी लिहिले, “काही नाती नशिबाने तयार होतात. रक्ताचे नाही तर हृदयापासून तयार झालेली काही नाती असतात. दिशा वकानी फक्त आपली दयाभाभी नाही, तर माझी बहीणसुद्धा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकमेकांबरोबर अनेक आठवणी तयार केल्या आहेत. एकत्र हसलो आहोत. दरम्यानच्या वर्षांत आमचे नाते स्क्रीनच्या पुढे गेले आहे. या रक्षाबंधनला तोच आपलेपणा, आमच्यातील अतूट नात्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. या नात्यातील गोडवा कायम असाच राहू दे”, असे म्हणत असित मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
आजही प्रेक्षक मालिकेत दया कधी परतणार, असा प्रश्न विचारताना दिसतात. काही वेळा ती मालिकेत परतणार असल्याचे म्हटले जाते. तर काही वेळा दिशाऐवजी दुसरी अभिनेत्री हे पात्र साकारत असल्याचे म्हटले जाते.मात्र, आतापर्यंत मालिकेत दिशा परतली नाही किंवा दयाबेनच्या पात्रात इतर कोणती अभिनेत्री दिसली नाही.
दरम्यान, मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिका सोडली. काही कलाकारांनी असित मोदींवर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. आता दिशा मालिकेत कधी परतणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.