Tabu praises Priyadarshan Jadhav: अभिनेता प्रियदर्शन जाधवने आतापर्यंत चित्रपट, टीव्ही शो व नाटक या तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या तो झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे.

‘चला हवा येऊ द्या – कॉमेडीचं गँगवॉर’ हा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, गौरव मोरे व प्रियदर्शन जाधव यांच्या वेगवेगळ्या टीम असल्याचे पाहायला मिळते.

आता मात्र, अभिनेता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे नाही, तर त्याच्या एका सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे.

प्रियदर्शनचे कौतुक करत तब्बू काय म्हणाली?

प्रियदर्शन जाधवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने तब्बूबरोबरचा फोटो शेअर करीत लिहिले, “२ वाजून २२ मिनिटांच्या १०० व्या प्रयोगाला तब्बू आली होती. ती म्हणाली की, तू खूप छान काम केलेस.”

” ‘माचिस’, ‘हेराफेरी’, ‘अस्तित्व’, ‘विरासत’, ‘हुतूतू’, ‘चांदणी बार’, ‘मकबूल’, ‘चिनी कम’, ‘हैदर’, ‘द नेमसेक’, ‘इरुवर’, ‘बीवी नंबर १’, ‘दृश्यम’ आणि अशा कित्येक उत्तम सिनेमांत जिनं अफलातून काम केलं. अशा नटीनं, तू उत्तम काम केलंस (You are too good), असं म्हटलं. लई झालं भावांनो.”

पुढे अभिनेता म्हणाला, “नाटक पाहून कुणी कौतुक केलं की, २-४ दिवस जरा वजन वाढतं. तेवढं चालतंय. नाही तर आमचं वजन वाढणार तरी कधी?”, असे म्हणत अभिनेत्याने त्याचा आनंद व्यक्त केला.

प्रियदर्शनच्या पोस्टवर कलाकारांनी कमेंट्स करीत त्याचे कौतुक केले आहे. अभिनेता हृषिकेश शेलार व प्रार्थना बेहेरे यांनी इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. तर अनेक चाहत्यांनीदेखील अभिनेत्याचे कौतुक केले आहे.

“संपला विषय”, “एक नंबर”, “अभिनंदन प्रियदर्शन आणि सर्व टीम”, “मग आहेसच तू टू गुड”, “अभिनंदन”, “खरंच आहे ते”, “जबरदस्त”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर, अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत अभिनेत्याचे कौतुक केले आहे.

तब्बूच्या कामाबाबत बोलायचे, तर अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपटांत काम केले आहे. अभिनेत्री लवकरच ‘दे दे प्यार दे २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.