Tarini Fame Prashant Keni Shared His Experience Of Working With Ahidnya Bhave : ‘तारिणी’ ही नवी कोरी मालिका नुकतीच सुरू झाली आहे. यामध्ये मराठीतील अनेक लोकप्रिय कलाकारांची वर्णी लागली आहे. अभिनेत्री शिवानी सोनार यात मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे. तिच्यासह अभिज्ञा भावेसुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेतून पाहायला मिळत आहे. अशातच यातील अभिनेत्याने अभिज्ञासह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
‘तारिणी’ मालिका नुकतीच सोमवारी ११ ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे. यामध्ये शिवानी सोनार, अभिज्ञा भावे, स्वराज नागरजोगे, प्रशांत केनी हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांतून झळकणार आहेत. अशातच मालिकेच्या प्रमोशननिमित्त अभिज्ञा व प्रशांत यांनी नुकतीच ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी मालिकेबद्दल तसेच त्यांच्या सेटवरील गमती जमतींबद्दल सांगितले आहे.
प्रशांत केनीने सांगितला ‘तारिणी’ मालिकेत अभिज्ञा भावेसह काम करण्याचा अनुभव
मुलाखतीत प्रशांतने अभिज्ञासह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ‘तारिणी’ मालिकेत प्रशांत केनी अभिज्ञाच्या भावाची म्हणजेच युवराज खांडेकर ही भूमिका साकारत आहे, तर अभिज्ञा यामध्ये कौशिकी खांडेकर ही भूमिका साकारतेय. अशातच प्रशांतने अभिज्ञासह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. अभिज्ञाबद्दल प्रशांत गमतीत म्हणाला, “तिच्याबरोबर सीन करताना मला घाबरण्याचा अभिनय नाही करावा लागत, कारण तिचं व्यक्तिमत्त्वच तसं आहे.”
प्रशांत पुढे म्हणाला, “यापूर्वी मी ‘झी मराठी’च्या अनेक मालिकांमध्ये तिला पाहिलं आहे आणि यापूर्वी आम्ही कधीच एकत्र काम केलं नव्हतं, त्यामुळे मला तिच्याबद्दल आदरयुक्त भीती आहे. तिच्याबरोबर सीन करताना मला डोक्यात काही वेगळी तयारी करावी लागत नाही. तिच्याबद्दल आदरयुक्त भीती माझ्या डोक्यात आधीपासूनच आहे, त्यामुळे मालिकेत जे मी तिला सॉरी म्हणत असतो ते मनापासून बोलत असतो. मला असं खरंच वाटतं, मी अभिनयात काही चूक केलीये का?”
अभिज्ञाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत प्रशांत पुढे म्हणाला, “एकदा हॉटेलमधील सीन करत असताना तिने मला जो लूक दिला, त्यानंतर मला असं खरंच वाटलं की मी कुठेतरी चुकलोय.”