Tarini Fame Shivani Sonar Talks About Late Priya Marathe : लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाने मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली. प्रियाच्या निधनामुळे तिच्या जवळच्या कलाकार मित्र-मैत्रिणींना धक्का बसला. अनेकांनी सोशल मीडियावर तिच्याबद्दल पोस्ट करीत तिच्याबरोबरच्या आठवणी सांगितल्या. अशातच प्रियाची सहकलाकार व अभिनेत्री शिवानी सोनारने तिच्याबद्दल प्रतिक्रिया देत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
शिवानी सोनार व प्रिया मराठे यांनी ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत एकत्र काम केले होते. शिवानीने प्रियाबरोबरच्या आठवणी सांगताना भावुक होत प्रतिक्रिया दिली आहे. शिवानीने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी’ला मुलाखत दिली. त्यामध्ये ती म्हणाली, “खरं तर मी याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मी तिचा कुठलाच फोटो किंवा स्टोरी शेअर केली नव्हती. कारण तेव्हा ती हिंमतच नाही झाली ते सगळं करायची. मला दोन दिवस लागले हे सगळं पचवायला. मला माहीत नाही आतापण मी काय आणि कशी बोलणार आहे.”
ती खूप मोठी व्यक्ती होती – शिवानी सोनार
शिवानी पुढे म्हणाली, “आम्हाला थोडीफार कल्पना होती याबद्दल. कारण- अगदीच शेवटचा शो मी तिच्याबरोबर केला. फार वेळ आम्ही एकत्र नव्हतो. महिना-दीड महिनाच मी तिच्याबरोबर मेकअप रूम शेअर केली आहे; पण काही माणसं राहतात तुमच्यासोबत कायम. त्यामुळे मला असं वाटतं की, तीही राहील. मला यापूर्वी ही गोष्ट जाणवली नव्हती. पण, जेव्हा मराठी इंडस्ट्रीतील सगळे कलाकार तिच्याबद्दल भावना व्यक्त करीत होते तेव्हा तिच्याबरोबरच्या आठवणी ते सांगत होते. तेव्हा तिचं मोठेपण खऱ्या अर्थानं कळतं की, ती कोणी साधीसुधी व्यक्ती नव्हती. ती खरंच खूपच मोठी व्यक्ती होती.”
शिवानी सोनारने सांगितल्या प्रिया मराठेबरोबरच्या आठवणी
मालिकेदरम्यानच्या आठवणी सांगताना शिवानी म्हणाली, “मी, प्रिया व भक्ती रत्नपारखी आम्ही तिघी रूम शेअर करायचो. भक्तीताई आणि मी त्या दिवशी एकमेकींबरोबर बोललोच नाही. मी पुण्यात असल्यामुळे मला तिच्या अंत्यदर्शनाला जाता आलं नाही; पण भक्तीताई गेलेली. दुसऱ्या दिवशी माझं आणि भक्तीताईचं बोलणं झालं. एका बाजूला असं वाटतं की, ती सुटली त्या त्रासातून. कारण- तिला शेवटी शेवटी खूप जास्त त्रास होत होता. मग असं वाटायचं की, एवढ्या चांगल्या व्यक्तीला एवढ्या यातना नको. त्यामुळे आता असं वाटतं की, ती आता जिथे कुठे असेल तिथे ती १०० टक्के सुखी असेल यात वादच नाही. आपण म्हणतो ना की, देव कधी कधी खूप चांगल्या माणसांबरोबर खूप वाईट गोष्ट करतो. तसं काहीसं प्रियाताईबरोबर झालं.”
शिवानी पुढे मेकअप रूममधील आठवणी सांगत म्हणाली, “आमच्या मेकअप रूमचा रंग गुलाबी होता. आम्हाला सगळ्यांनाच तो रंग असा अंगावर यायचा की, काय हा रंग असा आहे वगैरे… मी शूटमध्ये व्यग्र असायचे; पण प्रियाताईने एक छान पेंटिंग केलं होतं भिंतीवर. तो व्हिडीओ भक्तीताईनं शेअर केला आहे. त्या पेंटिंगमध्ये चिमण्या होत्या अशा छान. त्यामुळे त्या पेंटिंगनं जरा छान वाटायचं.”
शिवानीने पुढे सांगितले, “याच सेटवर आम्ही भेटलेलो. त्यामुळे आज सुदैवानं मी सेटवर असल्यानं त्या रूममध्ये गेले होतो की, काहीतरी तिची आठवण आहे, जी आपल्याबरोबर कायम राहील म्हणून. आता त्या रूमचा रंग बदलण्यात आला आहे; पण मी तिथे गेले होते.” शिवानी सध्या ‘तारिणी’ मालिकेत काम करीत आहे. याच जागी पूर्वी ‘तू भेटशी नव्या’ने मालिकेचा सेट असल्याचे तिने यामधून म्हटले आहे.
शिवानी सोनारने केलं प्रिया मराठेचं कौतुक
शिवानी पुढे प्रियाचे कौतुक करीत म्हणाली, “मला असं वाटतं की, ती खूप मोठी व चांगली कलाकार होती आणि या सगळ्यापेक्षा ती उत्तम माणूस होती. अशी माणसं खूप कमी भेटतात आणि या क्षेत्रात तर खूप कमी भेटतात. ती आता जिथे कुठे असेल तिथे सुखी असेल आणि शांत असेल. ती कायमच खूप सकारात्मक असायची. शिस्तप्रिय होती ती, समंजस होती आणि आम्ही सेटवरील काही जण ठाण्यात राहायचो. ठाण्यात आमचा सेट होता. ती मिरा रोडला राहायची आणि येताना ती आमच्यासाठी ताक, कोशिंबीर असं काय काय घेऊन यायची. आमचे खूप लाड केलेत तिनं.”
शिवानी म्हणाली, “मला असं वाटतं की, तिच्याबरोबर असं व्हायला नको होतं. ती खूप लढाऊ वृत्तीची होती. आमचं शेवटचं बोलणं हे मी माझ्या लग्नाची पत्रिका पाठवलेली तिला तेव्हा झालेलं. त्यावेळी मी तिला तुला जमलं तर ये, असं म्हणाले होते. त्यावेळी तिनं मला एक खूप मोठा मेसेज केला होता की, नवीन सगळं सुरू होतंय. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. असं सगळं. तेव्हा तिनं मला सांगितलेलं की, मी नाही येऊ शकणार शिवानी; पण तू आनंदी राहा. असं कर, तसं कर. मला वाटतं की, तिनं तिच्यामुळे तिच्या आजूबाजूच्या लोकांना त्रास व्हायला नको म्हणून लोकांपासून लांब राहण्याचा निर्णय घेणं तिच्यासठी खूप कठीण झालं असेल.”
शेवटी शिवानी पुढे म्हणाली, “तिच्यामध्ये जो समजूतदारपणा होता, त्यातला थोडा जरी माझ्यात आला ना तरी खूप झालं. मी तिला एवढंच सांगेन की, तुझं असं जाणं अपेक्षित नव्हतं; पण आता जिथे आहेस, तिथे आनंदी राहा. इथे तू सगळ्यांची प्रिय होतीच; पण तिकडेही तू सगळ्यांची प्रिया असणारच आहेस हे मला माहीत आहे.”