Tejashri Pradhan and Subodh Bhave: पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांचे पडद्यामागे नाते कसे असेल, त्यांच्यात मैत्री असेल का? ते एकमेकांशी कसे वागत असतील? ऑफ कॅमेरा ते एकमेकांबाबत काय विचार करत असतील, असे अनेक प्रश्न चाहत्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांविषयी पडतात.

लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या नवीन मालिकेतून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याआधी त्यांनी ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. आता या चित्रपटानंतर या मालिकेतून पुन्हा एकदा त्यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

तेजश्री प्रधान व सुबोध भावे काय म्हणाले?

तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांना त्यांचे ऑफस्क्रीन बॉण्डिंग कसे आहे, असे विचारले. यावर तेजश्री म्हणाली, “ऑफ कॅमेरा आमचं अनेक गोष्टींवर एकमत होतं. खाण्यापासून ते क्रिएटिव्हिटी सगळ्या बाबतीत आमचं एकमत होतं.”

सुबोध भावे यावर म्हणाले, “काही लोकांबरोबर टॉम अँड जेरीसारखं बॉण्डिंग होतं, तर काही लोकांशी खूप चांगली मैत्री होते. मला वाटतं आम्ही दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आहोत; कारण दोन माणसं विरुद्ध असतील तर टॉम अँड जेरीसारखं होतं. पण, आमचे स्वभाव विरुद्ध नाहीत.”

पुढे मुलाखतीत या दोन्ही कलाकारांना त्यांची काही टोपणनावे आहेत का? असे विचारले. यावर सुबोध भावे म्हणाले, “माझी काही टोपणनावे नाहीत. पण, माझ्या मित्रांची खूप आहेत. टोपणनावं मला आवडतात, पण माझं कोणी ठेवलं नाही, तर मग मी कसं कोणाला जबरदस्तीने सांगू की आम्हाला या टोपण नावाने हाक मारा.”

तर तेजश्री प्रधान म्हणाली, “मला माझी आई लहानपणी चिंगू म्हणायची. ते नाव मला आठवतंय. बाकी तेजश्री हे नावचं खूप मोठं आहे, त्यामुळे लोक मला तेजा किंवा तेजू अशी हाक मारतात.

तेजश्री प्रधान व सुबोध भावे या दोन्ही कलाकारांचा चाहतावर्ग मोठा आहे. तेजश्रीने आतापर्यंत ‘होणार सून मी या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’, ‘प्रेमाची गोष्ट’ अशा मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. काही चित्रपटांतदेखील ती दिसली आहे; तर सुबोध भावे हे त्यांच्या अनेक चित्रपटांतील भूमिकांसाठी ओळखले जातात. ‘तुला पाहते रे’सारख्या काही मालिकांतदेखील त्यांनी काम केले आहे. त्या भूमिकांनादेखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेलादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.