Tejashri Pradhan on horoscope before marriage: लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे व अभिनेत्री तेजश्री प्रधान वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दोन्ही कलाकारांना छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
“पत्रिका न बघतासुद्धा आमचं लग्न इतके वर्षे टिकले आहे”
काही दिवसांपूर्वीच ताज हॉटेलमध्ये या मालिकेची पत्रकार परिषद पार पडली. यादरम्यान तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांनी ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना लग्नासंबंधी विविध प्रश्न विचारण्यात आले.
लग्नाआधी दोघांची पत्रिका पाहायलाच हवी का? यावर सुबोध भावे म्हणाले, “आमच्या लग्नावेळी आम्ही बघितली नव्हती, त्यामुळे असं करायलाच हवं असं मी म्हणणार नाही; कारण पत्रिका न बघतासुद्धा आमचं लग्न इतके वर्षे टिकले आहे. आमचा संसार उत्तम सुरू आहे, त्यामुळे लग्नावेळी पत्रिका बघणे हे ज्याची त्याची निवड असावी.”
“पत्रिका तुमचं आयुष्य…”,
तेजश्री प्रधान या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाली, “हो बरोबर आहे. प्रत्येकाची ती निवड असावी. जर कोणाला पत्रिका बघावी वाटत असेल, तरी मला असं वाटतं की आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या ऋषीमुनींनी त्यामागे काही शास्त्र लिहून ठेवली आहेत. तर पत्रिकेतील गुण जुळणं, न जुळणं या गोष्टी कुठेतरी स्वभावाला धरून किंवा आपल्या जन्मासकट येणाऱ्या गोष्टींबाबत असतात, त्यामुळे काळजी घ्यायची म्हणून पाहा. पण, पत्रिका तुमचं आयुष्य ठरवणार नाही, त्यासाठी सतत कष्ट घ्यावे लागणार आहेत.”
हळद लागल्यावर नवरा नवरीने घराबाहेर पडू नये असं म्हणतात, यावर तुमचं मत काय? यावर सुबोध भावे म्हणाले, “ज्याला जे योग्य वाटतं त्याने ते करावं.” तर तेजश्री प्रधान म्हणाली, “मी या गोष्टींवर किती विश्वास ठेवते किंवा नाही ठेवत, यापेक्षा मला असं वाटतं की जर आपल्या मोठ्या लोकांनी काही सांगून ठेवलं आहे आणि ते करून जर नुकसान होणार नसेल तर मग आपण ते केलं पाहिजे.”
तेजश्री प्रधान काय म्हणाली?
समाजाने जे वय लग्नाचं ठरवलेलं आहे, त्या वयात लग्न केलं पाहिजे का? यावर सुबोध भावे म्हणाले, “मला असं वाटतं की असं काही कोणी समाज वगैरे ठरवत नसतं. सर्वसाधारणपणे एखादी गोष्ट सगळीकडे सामाईक पद्धतीने व्हायला लागली की समाजाने ठरवले असं म्हणतात. पूर्वी लग्नाचं वय १०, ११ होतं. मग ते पुढे गेलं. मग सज्ञान झाल्यानंतर व्हायला लागलं. नंतरच्या काळात विशी-पंचविशीमध्ये लग्नं व्हायला लागली. आता मुला-मुलींची करिअर असतात, त्यामुळे ती तिशीच्या पलीकडे गेली आहेत. पुढे सुबोध भावे म्हणाले, “लग्न कधी करायचं हा निर्णय त्या मुलीचा आणि मुलाचाच असायला पाहिजे.”
तेजश्री म्हणाली, “लग्न वेळेत करावं यापाठीमागे तर्क हा असावा की आपलं जितकं वय पुढे जातं, तेवढे तुम्ही जास्त स्वावलंबी होत जाता. आपण कमी गोष्टींमध्ये तडजोड करतो, कारण आपण स्वत:च्याच सहवासात जास्त जगत असतो, त्यामुळे लग्न वेळेत व्हावे असं म्हणत असतील.” दरम्यान, तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांची नवीन मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.