Tejashri Pradhan New Serial On Screen Brother Raj More : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या ११ ऑगस्टपासून ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये छोट्या पडद्यावरची स्टार अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. यामध्ये ती स्वानंदी सरपोतदार ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत स्वानंदीचं लग्न समर राजवाडेशी होईल. मात्र, हे लग्न स्वानंदीने आपल्या भावाच्या आणि समरने आपल्या बहिणीच्या सुखासाठी केलेलं असतं.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत तेजश्रीच्या भावाची भूमिका अभिनेता राज मोरे साकारत आहे. यापूर्वी राजने ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत काम केलेलं आहे. अभिनेत्याने नुकताच त्याचा तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.
या नव्या मालिकेत प्रेक्षकांना भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा, प्रेम आणि समजूतदारपणा पाहायला मिळणार आहे. मालिकेतील कथा जशी भावनिक आणि गुंतवून ठेवणारी आहे, अगदी त्याचप्रमाणे या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांमधील ऑफस्क्रीन नातं सुद्धा विशेष लक्षवेधी ठरत आहे. राज या मालिकेत रोहन सरपोतदार ही भूमिका साकारताना दिसणार आहे. तेजश्रीला तो ‘ताई’ म्हणतो. तेजश्री ताईकडून मिळालेला सल्ला आणि सहकार्य यामुळे एक वेगळीच ऊर्जा जाणवते असं अभिनेत्याने सांगितलं.
राज मोरे सांगतो, “आमच्या शूटला जास्त दिवस झालेले नाहीत, पण माझं आणि तेजश्री ताईचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग खूप छान झालंय. ती एकदम कडक शिस्तीची आहे हे मला इतक्या दिवसांत तिच्याबरोबर काम करून समजलं आहे. ती मला सांगते की आपण असं करू म्हणजे सीन अजून फुलून येईल, ती तांत्रिकदृष्ट्या फार चांगला सल्ला देते. जसं मध्येच कधी एखादा शब्द आपसूक बोलायचा असेल तर, तिला हे सगळं खूप छान सुचतं आणि त्याचा मलाही खूप फायदा होतो.”
“मला एका परफेक्ट सिनियरप्रमाणे तेजश्री ताईचं मार्गदर्शन मिळतंय, ज्याचा एक कलाकार म्हणून खूप फायदा देखील होत आहे. तेजश्री ताई नेहमी खात्री करते की, फक्त तिचंच नाहीतर आमच्या सर्वांचं कामही छान व्हायला हवं आणि त्यासाठीच तिचे प्रयत्न असतात. कारण, सगळं छान असेल तरच शो भरभराटीला येईल.” असं राज मोरेने सांगितलं.