Tejashri Pradhan Shared A Post : तेजश्री प्रधान ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर मालिका, चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तेजश्रीने तिच्या प्रत्येक कलाकृतीतून वेगवेगळ्या भूमिका साकारत तिच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता लवकरच तेजश्री एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तेजश्री ‘झी मराठी’ वाहिनीवरील आगामी मालिकेतून मुख्य भूमिका साकारणार आहे. तिच्या या नवीन मालिकेचं नाव ‘वीण दोघांतली ही तुटेना’ असं आहे. यामध्ये तिच्यासह अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेतून झळकणार आहे. सध्या या मालिकेचं प्रमोशन सुरू आहे. अशातच अभिनेत्रीने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्रीने या फोटोला खास कॅप्शनही दिलं आहे.
तेजश्रीने यावेळी मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती बस स्टॉपवर बसलेली दिसतेय. या पोस्टला तिने “ज्या जागांनी तुमच्या मनात माझ्यासाठी जागा निर्माण केली, त्या जागी जाऊन पुन्हा एकदा तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या आठवणींना जाग आली.. सज्ज झाल्ये पुन्हा एकदा तुमच्या मनात तिची “जागा” निर्माण करायला, एक नवीन पात्र, नव्या उमेदीने जगायला लवकरच भेटूया “स्वानंदी सरपोतदारला.. आशीर्वाद असू द्या” असं म्हटलं आहे.
तेजश्रीची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही आगामी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप या मालिकेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच यामध्ये सुबोध व तेजश्री यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे पाहणंदेखील रंजक ठरेल. ‘वीण दोघांतली ही तुटेना’मधून तेजश्री पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर परतणार आहे. यापूर्वी तिने ‘झी मराठी’वरील ‘अगं बाई सासुबाई’, ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तिच्या या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
दरम्यान, ‘वीण दोघांतली ही सुटेना’ या मालिकेपूर्वी तेजश्री ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’मधून मुख्य भूमिकेतून झळकली होती. यात तिने मुक्ता हे पात्र साकारलेलं. यातील तिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला, परंतु काही कारणांमुळे अभिनेत्रीने अर्ध्यातच या मालिकेतून एक्झिट घेतली. या मालिकेव्यतिरिक्त ती ‘हशटॅग तदेव लग्नम’, ‘लोकशाही’, ‘पंचक’ यांसारख्या चित्रपटांतून झळकली होती.