Tejashri Pradhan Serial Vin Doghantali Hi Tutena : ‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका सुरू होणार आहे. यामध्ये तेजश्रीसह लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्रीचे चाहते तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत तेजश्री प्रधान, स्वानंदीच्या भूमिकेत दिसणार आहे. या नव्या मालिकेच्या निमित्ताने तेजश्री पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याबद्दल तिच्या मनातही विशेष आनंद आहे. मालिकेच्या प्रोमो शूट दरम्यान तिने तिच्या नव्या भूमिकेबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या.
तेजश्री सांगते, “मी स्वानंदीच्या भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहे. स्वानंदी ही एक परिपक्व व्यक्तिरेखा आहे आणि ती प्रत्येक परिस्थिती देखील खूप समजूतदारपणे हाताळते. आमच्या मालिकेची टीम खूपच छान आहे आणि सहकलाकारही मस्त आहेत. त्यामुळे मालिकेचा प्रवास हा मजेशीर असणार आहे. या भूमिकेसाठी जेव्हा फोन आला तेव्हा आनंदच झाला कारण, कॉल करणारी माणसं आपली होती. त्यातही नाही म्हणावं असं काही कारणच दिसलं नाही, टीम छान आहे, मालिकेचा विषय गोड आहे आणि पूर्वीची काही माणसं देखील एकत्र आली आहेत. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील पडद्यामागे काम करणाऱ्या काही तंत्रज्ञांची टीमही या नव्या मालिकेसह जोडली जाणार आहे.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांशी खूप छान नातं निर्माण झालं आहे. जेव्हा प्रोमो आला तेव्हा त्यांच्या प्रेमावर मला इतका विश्वास होता की अवघ्या काही तासांतच प्रोमोला भरभरून प्रतिसाद मिळाला, चाहत्यांनी उदंड प्रेम दिलं. सुबोध दादाबरोबर काम करायला मिळतंय याचा विशेष आनंद आहे.”
रात्री २ वाजता शूट केला ‘तो’ सीन
“जेव्हा आमचा दुसरा प्रोमो लॉन्च करण्यात आला तेव्हा त्यालाही छान प्रतिसाद मिळाला आणि मला त्या प्रोमो मागचा एक किस्सा सांगावासा वाटतो एक शॉट आहे जिथे स्वानंदीच्या ताटात गुलाबजामून आहे, तो शॉट आम्ही मध्यरात्री २ वाजता शूट केला आहे. शूटिंगमध्ये एक शॉट खूप वेगवेगळ्या अँगल्सनी शूट केला जातो आणि रात्री २ वाजता गुलाबजामून खायचा या विचारानेच मला टेन्शन आलं, माझी झोप उडाली होती. आम्ही त्या सीनसाठी एकूण ७ -८ गुलाबजामूनचा वापर केला. त्याच प्रोमोच्यावेळी संपूर्ण टीम पहिल्यांदा भेटली. मी शेवटी हेच म्हणेन की प्रेक्षकांना एक चांगली मालिका देण्याचा आम्हा सर्वांचा प्रयत्न असणार आहे.” असं तेजश्रीने सांगितलं.
दरम्यान, तेजश्री आणि सुबोध यांची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही नवीन मालिका येत्या ११ ऑगस्टपासून दररोज संध्याकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांना ‘झी मराठी’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.