Tejashri Pradhan Vin Doghantali Hi Tutena Serial First Episode : तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा पहिला भाग नुकताच प्रसारित करण्यात आला. या मालिकेच्या निमित्ताने तेजश्री ७ महिन्यांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतली आहे. टेलिव्हिजनची स्टार अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. आजवर तेजश्रीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या शोकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेच्या पहिल्या भागात प्रेक्षकांना स्वानंदी आणि समरच्या कामाची, त्यांच्या स्वभावाची झलक पाहायला मिळाली. स्वानंदी सर्वांचं मन जपत, आपल्या कुटुंबीयांच्या आनंदात समाधानी राहून आपलं आयुष्य जगत असते. ती ट्रॅव्हल कंपनीत कामाला असते, वयाच्या ३५ व्या वर्षी सुद्धा ती अविवाहित असते. पहिल्याच भागात तिला कंपनीत प्रमोशन मिळाल्याचं पाहायला मिळतं.

तर, दुसरीकडे समर राजवाडेची ग्रँड एन्ट्री या मालिकेत पाहायला मिळाली. त्याच्या चुलत बहिणीला नुकतीच मुलगी झालेली असते. बहीण आणि भाचीच्या आनंदासाठी समर चक्क राजवाडा खरेदी करतो, या राजवाड्यातील एक सोन्याचा बाऊल आणि चमचा त्याच्या बहिणीला प्रचंड आवडलेला असतो. हीच भेटवस्तू घेऊन तो भाचीच्या अन्नप्राशन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.

‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचा एपिसोड संपताना समर आणि स्वानंदी हे दोघंही मंदिरात गेल्याचं पाहायला मिळतं. पण, देवाकडे डोळे बंद करून प्रार्थना करत असल्याने त्यांची एकमेकांशी भेट होत नाही. हा एपिसोड प्रेक्षकांना कसा वाटला जाणून घेऊयात…

प्रेक्षकांनी ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेचा पहिला एपिसोड पाहून आनंद व्यक्त केला आहे. “ही मालिका नक्की सुपरहिट होणार”, “खूपच सुंदर एपिसोड होता”, “तेजूला सुरुवातीच्या सीनमध्ये पाहून ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेची आठवण झाली”, “खूप मस्त”, “अप्रतिम भाग”, “तेजश्री नेहमीच प्रत्येकाचं मन जिंकून घेते”, “पहिला एपिसोड मस्त दणक्यात पार पडला… गोष्टीचा पाया प्रेमाने घातला आणि पात्रांची एकामागोमाग उलगड घडली. त्यामुळे पहिला भाग खूप आवडला.” अशा प्रतिक्रिया ‘झी मराठी’च्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून आल्या आहेत.

दरम्यान, तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही नवीन मालिका प्रेक्षकांना रोज सायंकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.