Tharala Tar Mag Promo Court Case Updates : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येत आहेत. वात्सल्य आश्रमाच्या केसचा निकाल लागण्यासाठी फक्त १० दिवस बाकी राहिले आहेत. आता पुढच्या दहा दिवसांत साक्षी विरोधातील कोणते पुरावे अर्जुनला सापडणार? ती दोषी असल्याचं अर्जुन कसं सिद्ध करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय ऐनवेळी दामिनी साक्षी शिखरेला वाचवण्यासाठी मोठा डाव खेळण्याची देखील शक्यता आहे.
आश्रम केसमध्ये आतापर्यंत कोणाची बाजू वरचढ आहे आणि कोर्टात नेमकं काय-काय घडलंय याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…
‘ठरलं तर मग’ – आश्रम केसमध्ये आतापर्यंत काय घडलं?
वात्सल्य आश्रम केसचा अर्जुनने काही दिवसांपूर्वीच नव्याने अभ्यास करायला घेतला होता. तो सायली आणि चैतन्यसह पुन्हा एकदा आश्रमात जातो आणि याच दरम्यान अर्जुनला दोन महत्त्वाचे पुरावे सापडतात. पहिला पुरावा म्हणजे व्हिजिटिंग कार्ड आणि दुसरा पुरावा म्हणजे अर्ध्या तुटलेला पेडंटचा तुकडा…
अर्जुनने नुकतेच कोर्टात हे दोन्ही पुरावे सादर केले आणि यामुळे साक्षी शिखरेसह दामिनी-महिपतला मोठा धक्का बसला होता. याशिवाय अर्जुनच्या बाजूने पोलिसांनी देखील कोर्टात साक्ष दिल्याने साक्षी चांगलीच तोंडावर पडते. दामिनीकडे देखील काहीच पर्याय उरत नाही.
आता हळुहळू वात्सल्य आश्रमाची केस अर्जुनच्या बाजूने होतेय, असं वाटत असतानाच दामिनीच्या डोक्यात एक नवीन प्लॅन येतो. खूनाच्या रात्री साक्षी शिखरेकडे दोन फोन असल्याचा अंदाज अर्जुनला येतो. त्यामुळे तो चैतन्यच्या मदतीने आश्रमाजवळ खूनाच्या रात्री एकूण किती फोन नंबर सक्रिय होते याची यादी मागवतो. या यादीत अर्जुनला एक अनोळखी फोन नंबर दिसतो आणि तोच साक्षीच्या दुसऱ्या फोनचा मोबाइल नंबर असतो.
साक्षी दोन फोन वापरते आणि खूनाच्या रात्री आश्रम परिसरात ती उपस्थित होती हे या कॉल डिटेल्सच्या यादीवरून स्पष्ट होत आहे. अर्जुनच्या हाती हा मोठा पुरावा लागल्याने तो प्रचंड आनंदी होतो, त्याचा आत्मविश्वास बळावतो. पण, दुसरीकडे दामिनी एक मोठा डाव खेळणार आहे.
खूनाच्या रात्री साक्षीकडे दोन फोन होते ही माहिती दामिनीला सुद्धा कळते. त्यामुळे ती लगेच तिच्या माणसाला टेलिकॉम कंपनीत पाठवून खूनाच्या रात्रीचं साक्षी शिखरेचं लोकेशन आणि कॉल डिटेल्स डिलीट करण्यास सांगते. पण, टेलिकॉम कंपनीत गेल्यावर कॉल डिटेल्सची यादी आधीच कोणीतरी मागून नेलीये अशी माहिती दामिनीला मिळते.
आता साक्षीचे कॉल डिटेल्स तपासणारा दुसरा-तिसरा कोणी नसून अर्जुन असणार याची दामिनीला पक्की खात्री असते. त्यामुळे केसचा अभ्यास करण्यासाठी आणि कोर्टात पुढील जबाब काय द्यायचा हे सांगण्यासाठी दामिनी साक्षीला भेटायला बोलावते. “आता कोर्टाची माफी मागून मी आश्रम परिसरात उपस्थित होते, मी खोटं बोलले असं मान्य करायचं” हा सल्ला दामिनी साक्षीला देते.
१० दिवसांमध्ये नेमकं काय घडणार? प्रेक्षकांचा अंदाज काय?
आता निकाल लागण्यासाठी फक्त १० दिवस उरले आहेत. त्यामुळे मालिकेच्या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी असंख्य कमेंट्स करत या केसचा निकाल काय लागू शकतो याबद्दल अंदाज वर्तवला आहे. “निकाल लागणार पण प्रियाचा खोटारडेपणा समोर येणार नाही. प्रिया स्वत:ला वाचवणार असं दिसतंय”, “प्रिया आणि त्या काकाचं ( नागराज ) सत्य सुद्धा समोर आलं पाहिजे”, “प्रिया स्वतःला वाचवणार… माफीचा साक्षीदार होईल!” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.