Tharala Tar Mag Serial 8 Aug To 10 Aug Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत नुकताच वात्सल्य आश्रम केसचा निकाल जाहीर करण्यात आला असून आता साक्षी शिखरे आणि प्रिया या दोघींची रवानगी जेलमध्ये करण्यात आलेली आहे. निकाल लागल्यामुळे अखेर अडीच वर्षे बंद असणारा वात्सल्य आश्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. सगळे सुभेदार कुटुंबीय यावेळी आश्रमात जाणार आहेत. त्यांच्यासह प्रतिमा व रविराज किल्लेदार देखील उपस्थित असतील.
प्रिया इतके दिवस मालिकेत खोट्या तन्वीचं सोंग घेऊन वावरत आहे. पण, प्रत्यक्षात रविराज आणि प्रतिमा यांची खरी मुलगी सायली असते, हे सत्य सध्या फक्त प्रियालाच माहिती आहे. मात्र, आता सायलीच खरी तन्वी असल्याचा संशय मधुभाऊंना येणार आहे. तो कसा ते पाहुयात…
वात्सल्य आश्रमाला भेट देण्यासाठी सुभेदार व किल्लेदार कुटुंबीय जातात. आश्रमात पोहोचल्यावर सर्वात आधी सगळेजण मिळून सायली-अर्जुनची माफी मागतात. एवढे दिवस या दोघांवर अविश्वास दाखवला याची खंत प्रत्येकाच्या मनात असते. पण, सायली माफी मागण्याची काहीच गरज नाही असं सांगते आणि पुढे म्हणते, “एकाच अटीवर माफ करेन…आयुष्यभर माझ्या हातचं जेवावं लागेल” नातसुनेचे हे शब्द ऐकताच पूर्णा आजी तिला प्रेमाने जवळ घेते.
प्रतिमा यादरम्यान संपूर्ण आश्रम पाहत असते. कारण, तिला आश्रमात पोहोचल्यावर लेकीची आठवण येते. यावेळी प्रतिमाला भिंतीवर रेखाटलेलं सुंदर चित्र दिसतं, हे चित्र माझ्या तन्वीचं आहे असं ती म्हणते. हे सगळं दुरुन मधुभाऊ पाहत असतात. भिंतीवरचं चित्र तर सायलीने रेखाटलंय हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे ते चित्रकलेच्या जुन्या वह्या तपासून पाहतात. यानंतर भिंतीवरचं आणि सायलीच्या जुन्या वहीमधलं चित्र त्यांना सारखंच असल्याचं दिसतं. यावरून आपली सायलीच खरी तन्वी किल्लेदार तर नाही ना? प्रियाने याबाबतीत सुद्धा तिची फसवणूक केली नसेल ना? असा संशय मधुभाऊंच्या मनात निर्माण होतो.
आता मधुभाऊ मनातील शंका कोणासमोर व्यक्त करणार? खरी तन्वी कोण आहे याची जाणीव प्रतिमाला होईल का? अर्जुनसमोर हे सत्य आलं तर तो बायकोची खरी ओळख काय आहे हे तपासून पाहणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळतील.
दरम्यान, वात्सल्य आश्रम विशेष भाग प्रेक्षकांना ८ ऑगस्ट ते १० ऑगस्ट यादरम्यान ‘ठरलं तर मग’ मालिकेत पाहायला मिळतील. ही मालिका ‘स्टार प्रवाह’वर ८:३० वाजता प्रसारित केली जाते.