Tharala Tar Mag Fame Amit Bhanushali New Home : ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे अभिनेता अमित भानुशाली महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला. त्याने या मालिकेत साकारलेल्या अर्जुन सुभेदारच्या भूमिकेला गेल्या अडीच वर्षांत चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपासून अमित त्याने मालिकेत केलेल्या ५० पानांच्या कोर्ट सीनमुळे चर्चेत होता. या भागाला सर्वाधिक टीआरपी मिळाल्यावर अर्जुनचं चाहत्यांसह सहकलाकारांकडून भरभरून कौतुक करण्यात आलं होतं.

आता अमितने त्याच्या सगळ्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. गणेशोत्सवानिमित्त अमितने नुकतीच त्याच्या कुटुंबासह राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्याने नव्या घराची इच्छा पूर्ण झाल्याचं चाहत्यांना सांगितलं. गेल्यावर्षी बाप्पाला म्हणालो होतो नवीन घर होऊदे आणि यंदा त्याच्या आगमनापूर्वीच आमचं नवीन घराचं स्वप्न पूर्ण झालं होतं असं अमितने सांगितलं.

अमितची पत्नी श्रद्धा यावर म्हणाली, “खरंतर, गेल्यावर्षी गणपतीच्यावेळी आम्हाला मुलाखतीत एक प्रश्न विचारला होता. तुम्हा दोघांची अशी कोणती इच्छा आहे जी बाप्पाने पूर्ण करावी आणि तेव्हा आम्ही दोघांनी एक इच्छा आमच्या बाप्पाकडे बोलून दाखवली होती. यंदा बाप्पाचं आगमन होण्यापूर्वी आमची ती इच्छा पूर्ण झाली होती…ते म्हणजे आमचं नवीन घर. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाचं स्वप्न या नव्या घराच्या निमित्ताने पूर्ण झालं आहे.”

यासह अमितच्या शेजारी राहणारे गृहस्थ यावेळी म्हणाले, “हे लोक आल्यापासून हृधानमुळे आमचा ३६ वा माळा एकदम गजबजून गेला आहे.” यावरून अभिनेत्याचं नवीन घर ३६ व्या मजल्यावर असल्याचं स्पष्ट झालं.

दरम्यान, अमित भानुशालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर अभिनय क्षेत्रातील त्याचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला होता. जवळपास दीड वर्षे अभिनेता इंडस्ट्रीत ऑडिशन देत होता. पण, त्याला कुठेही काम मिळत नव्हतं. यानंतर हळुहळू त्याने मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.