Tharala Tar Mag Shooting BTS : ‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. या मालिकेतील बहुप्रतीक्षित वात्सल्य आश्रम केसचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. अर्जुनने या केसमध्ये बाजी मारली असून, त्याचे सासरेबुवा मधुकर पाटील यांची निर्दोष सुटका झालेली आहे. याशिवाय साक्षी आणि प्रियाला कोर्टाने शिक्षा देखील सुनावली आहे.
केसचा निकाल ३० दिवसांत जाहीर होणार हा ट्विस्ट समोर आल्यावर प्रेक्षक हा संपूर्ण सीक्वेन्स पाहण्यासाठी खूपच उत्सुक होते. मालिकेतील कलाकारांनी सुद्धा या संपूर्ण कथानकासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अमित भानुशालीने मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे पडद्यामागचे क्षण युट्यूबवर शेअर केले आहेत. याशिवाय इन्स्टाग्राम लाइव्हमध्येही अमितने त्याच्या सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
आजारपण आलं पण थांबलो नाही – अमित भानुशाली
अमित म्हणतो, “नमस्कार, आजचा एपिसोड बहुतेक सर्वांनाच खूप आवडलाय. मला बऱ्याच लोकांनी फोन करून सुद्धा सांगितलं की, कोर्टाचा सीक्वेन्स खूप छान झालाय. तुम्ही सर्वांनी अर्जुनला आणि या शोमधील प्रत्येक पात्राला खूप प्रेम दिलंत…हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. जेव्हा ३० दिवसांत निकाल लागणार आहे.. हे आम्हाला समजलं तेव्हा आम्ही सर्वांनीच खूप तयारी करायला केली होती. सर्वांना माहिती होतं की, खूप काम करावं लागणार आहे. त्यात आजारपण आलं…पण, आम्ही कोणीच थांबलो नाही. काही झालं तरी ‘शो मस्ट गो ऑन’ या गोष्टीवर माझा कायम विश्वास आहे. याचप्रमाणे मी मेहनत घेऊन काम केलं.”
“चॅनेल, निर्माते, लेखक, स्क्रीनप्ले लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन, लाइटमन, आमची टीम, प्रमोशनल टीम…आजचा एपिसोड चांगला झालं याचं श्रेय संपूर्ण टीमचं आहे. मालिकेचं शूटिंग करताना प्रत्येक दिवस ही नवीन परीक्षा असते. मालिकेत काम करणारे कलाकार कुठेही फिट होऊ शकतात हे मी कायम म्हणतो. सगळेजण खूप मनापासून काम करत आहेत. चॅनेलपासून ते निर्मात्यांपर्यंत प्रत्येकाचे मी आभार मानतो.” असं अमित सांगतो.
“आम्ही सगळे मेकअप रूममध्ये बसून आधी स्क्रिप्ट वाचतो. त्यानंतर मग शूटिंगला सुरुवात होते. कोर्ट सीक्वेन्स जेव्हा असतो, तेव्हा प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कोर्टाचा जो शेवटचा सीन होता तो एकूण ५० पानांचा होता. त्यात सगळ्यात जास्त माझे संवाद होतो…त्यामुळे खूप मेहनत घेतली होती.” असं अमितने त्याच्या युट्यूब व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.
दरम्यान, या मालिकेत आता पुढे काय घडणार? प्रियाला अटक झाल्यामुळे अश्विन काय निर्णय घेणार? पूर्ण आजी पुन्हा एकदा सायलीचा स्वीकार करतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.