Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या आश्रम केसच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिका सुरू झाल्यापासून गेली अडीच वर्षे सायली-अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, आता कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार जुलै महिन्यात काहीही करून या केसचा अंतिम निकाल लावण्यात येणार आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत आता आश्रम केसचा निकाल लागण्यासाठी फक्त २१ दिवस उरले आहेत. याचदरम्यान, अर्जुन एक मोठा डाव खेळणार आहे. काही दिवसांपूर्वीच अर्जुन आणि सायलीने साक्षी शिखरेच्या घरी जाऊन पुराव्यांची शोधाशोध केली होती. यावेळी त्यांच्या हाती साक्षीच्या पेडंटचा अर्धा तुकडा सापडला होता आणि आता अर्जुनच्या हाती आणखी एक मोठा पुरावा लागणार आहे. यामुळे मालिकेत निर्णायक वळण येणार आहे.
अर्जुनच्या हाती साक्षी शिखरेचे कॉल डिटेल्स लागले आहेत. तिच्या फोन कॉलच्या रिपोर्टनुसार खूनाच्या रात्री साक्षीचं लोकेशन वात्सल्य आश्रमाजवळचं असतं. अर्जुन सायलीला म्हणतो, “साक्षी आश्रमाजवळ होती हे या रिपोर्ट्समधून स्पष्ट होतंय…” यावर सायली म्हणते, “हे रिपोर्ट्स पाहून साक्षी खोटं बोललीये फक्त एवढंच सिद्ध होतंय.”
अर्जुन पुढे म्हणतो, “हे फोनकॉलचे रिपोर्ट्स आपण कोर्टात सादर केल्यावर दामिनी पलटवार नक्की करणार…आणि तिच्या खोटेपणाच्या जाळ्यात ती स्वत:च अडकेल. त्यामुळे हा महिन्याभराचा काऊंटडाऊन केवळ माझ्यासाठी नसून दामिनीसाठी सुद्धा आहे.”
आता अर्जुनने काढलेल्या निष्कर्षानुसार दामिनी खरंच त्याच्या प्लॅनमध्ये अडकणार की, उलटंच काहीतरी घडणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग ९ जुलैला रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.
दरम्यान, हा जबरदस्त प्रोमो पाहून नेटकऱ्यांच्या मनात देखील आश्रम केसच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आता आश्रम केसचा निकाल लागण्यासाठी केवळ २१ दिवस उरले आहेत. या सगळ्यातून अर्जुन कसा मार्ग काढणार? तो केस जिंकणार की हरणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.