Tharala Tar Mag 24 Sep To 26 Sep : ‘ठरलं तर मग’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधून काढण्यासाठी अनेक प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. बेशुद्ध होण्यापूर्वी मधुभाऊंनी सायलीच्या भूतकाळाबद्दल अर्जुनला मोठी हिंट दिलेली असते. तिचे आई-बाबा जिवंत आहेत हे ऐकताच आता काही करून सायली आणि तिच्या आई-बाबांची भेट घालून द्यायची असा निश्चय अर्जुन करतो. इतकंच नव्हे तर गणेशोत्सवात बाप्पाकडे तो याबद्दल प्रार्थना सुद्धा करतो.
कुसुम ताईकडून अर्जुनला सायलीचं शाळेतील आयकार्ड सापडतं. पण, आपला नवरा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करतोय हे समजल्यावर सायली प्रचंड दुखावली जाते. तुम्ही भूतकाळ शोधण्याचा अजिबात प्रयत्न करू नका कारण, माझी माणसं कायम माझ्यापासून दुरावतात असं सांगत सायली अर्जुनसमोर खूप रडते. यामुळे बायकोच्या अपरोक्ष या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा असा निर्णय अर्जुन घेतो.
आश्रमात राहणाऱ्या प्रत्येकाकडे त्यांचं जुनं गाठोडं असतं. यामध्ये जुन्या वस्तू आणि ही मुलं जेव्हा आश्रमात येतात त्याबद्दलचे काही पुरावे ठेवलेले असतात. आश्रमातील इतर सगळ्या सदस्यांची गोठाडी जागच्या जागी असतात. मात्र, विलासचा मर्डर झाल्यावर प्रिया तिचं स्वत:चं आणि सायलीचं गाठोडं गायब करते.
प्रियाला सुभेदार आणि किल्लेदारांकडे खोटी तन्वी म्हणून एन्ट्री घ्यायची असते. त्यामुळे, प्रिया सायलीचं गाठोडं स्वत:जवळ ठेवते आणि तिच्या गाठोड्याची विल्हेवाट लावते. यामुळेच प्रियाला सर्वांना तिच खरी तन्वी आहे असं सांगते. यानंतर कोणालाही लक्षात येऊ नये म्हणून हे गाठोडं लपवून ठेवते.
हेच गाठोडं आता अर्जुनच्या हाती लागणार आहे. यामध्ये अर्जुनला तन्वीबद्दल अनेक गोष्टी सापडतात. त्यामुळे अर्जुन आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांच्या जुन्या शाळेत जायचं ठरवतो. यावेळी शाळेतील मॅडमकडून तो २००३ ते २००४ या शैक्षणिक वर्षाची माहिती मिळवतो. शैक्षणिक वर्षाची फाइल समोर येताच अर्जुनला मोठा धक्का बसणार आहे. प्रियाच्या गाठोड्यातील फोटो आणि सायलीचा शाळेच्या प्रवेशिकेवरचा फोटो अगदी हुबेहूब मॅच होत असतो.
तन्वीच्या गाठोड्यातील फोटो आणि सायलीचा बालपणीचा फोटो मॅच कसा काय होऊ शकते? आता यामुळे प्रियाचं सर्वात मोठं नाटक मालिकेत उघड होईल का? सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य अर्जुनला समजेल का? प्रिया खोटी तन्वी होऊन इतके दिवस सर्वांची दिशाभूल करतेय हे समजल्यावर अर्जुन काय करणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ‘ठरलं तर मग’च्या आगामी भागात मिळणार आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेचे हे विशेष भाग २४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर दरम्यान रात्री ८:३० वाजता ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित केले जाणार आहेत.