Tharala Tar Mag Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये अर्जुनने साक्षी शिखरेला भर कोर्टात तोंडावर पाडल्याचं पाहायला मिळालं. पण, आता अर्जुनला मात देण्यासाठी दामिनी मोठा खेळ खेळणार आहे. मालिकेत पुढे काय घडणार जाणून घेऊयात…

भर कोर्टात अर्जुन पेडंटचा आश्रमात सापडलेला अर्धा तुकडा दाखवतो आणि यामुळेच साक्षीच्या चेहऱ्यावर बारा वाजतात. या पुराव्यामुळे ती खूनाच्या रात्री आश्रमात उपस्थित होती असं सिद्ध करण्याचा अर्जुन प्रयत्न करतो. मात्र, साक्षी आश्रमाजवळ होती हे सिद्ध करण्यासाठी त्याला आणखी एका पुराव्याची गरज असते. अर्जुन केसचा विचार करत असताना त्यांच्या घरातील मदतनीस विमल ताई अर्जुन-सायलीजवळ तिचा बिघडलेला फोन घेऊन येते. यावेळी तिच्याकडे दोन फोन आहेत असं ती सांगते. यावरून अर्जुनला मोठा क्लू मिळतो.

साक्षी शिखरेकडे देखील खूनाच्या रात्री दोन फोन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तो चैतन्यच्या मदतीने आश्रमाजवळ खूनाच्या रात्री एकूण किती फोन नंबर सक्रिय होते याची यादी मागवतो. या यादीत अर्जुनला एक अनोळखी फोन नंबर दिसतो आणि तोच साक्षीच्या दुसऱ्या फोनचा मोबाइल नंबर असतो.

साक्षी दोन फोन वापरते आणि खूनाच्या रात्री आश्रम परिसरात ती उपस्थित होती हे या कॉल डिटेल्सच्या यादीवरून स्पष्ट होत आहे. अर्जुनच्या हाती हा मोठा पुरावा लागल्याने तो प्रचंड आनंदी होतो, त्याचा आत्मविश्वास बळावतो. पण, दुसरीकडे दामिनी एक मोठा डाव खेळणार आहे.

दामिनीचा नवा प्लॅन

महिपत दामिनीशी केससंदर्भात चर्चा करताना साक्षीला तिच्या दुसऱ्या फोनवर करत असतो. यावेळी दामिनीला साक्षी दोन फोन वापरतेय अशी शंका येते. ती तातडीने महिपतकडे याबद्दल विचारपूस करते आणि खूनाच्या रात्री साक्षीकडे दुसरा फोन होता का? असं विचारते. महिपतने होकार दर्शवल्यावर ती लगेच तिच्या माणसाला टेलिकॉम कंपनीत पाठवून खूनाच्या रात्रीचं साक्षी शिखरेचं लोकेशन आणि कॉल डिटेल्स डिलीट करण्यास सांगते. पण, टेलिकॉम कंपनीत गेल्यावर कॉल डिटेल्सची यादी आधीच कोणीतरी मागून नेलीये अशी माहिती दामिनीला मिळते.

आता साक्षीचे कॉल डिटेल्स तपासणारा दुसरा-तिसरा कोणी नसून अर्जुन असणार याची दामिनीला पक्की खात्री असते. त्यामुळे केसचा अभ्यास करण्यासाठी आणि कोर्टात पुढील जबाब काय द्यायचा हे सांगण्यासाठी दामिनी साक्षीला भेटायला बोलावते. “आता कोर्टाची माफी मागून मी आश्रम परिसरात उपस्थित होते, मी खोटं बोलले असं मान्य करायचं” हा सल्ला दामिनी साक्षीला देते.

आता दामिनी या केसमधून माघार घेणार की, साक्षीला माफी मागायला सांगून दामिनीच्या डोक्यातील मूळ प्लॅन वेगळाच आहे हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता कोर्टात साक्षीने चूक कबूल केल्यावर अर्जुन हाती लागलेल्या कॉल डिटेल्सचं काय करणार, त्याचा पुढील प्लॅन काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग २१ जुलैला रात्री ८:३० वाजता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रसारित केला जाईल.