Tharala Tar Mag 6 August Promo : ‘ठरलं तर मग’ मालिकेत अखेर अर्जुन कोर्ट केस जिंकला असून साक्षी आणि प्रियाची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. विलास खून प्रकरणी साक्षीला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. तर, प्रियाला ७ वर्षांचा तुरुंगवास झाला आहे. सुभेदारांसमोर प्रियाचं खरं रूप उघड झाल्यावर प्रत्येकाला धक्का बसतो. पूर्णा आजी आणि कल्पनाला आपण चुकीच्या व्यक्तीची साथ दिली याची खंतही वाटते. पण, अश्विन अजूनही प्रियाच्या प्रेमात आंधळा झालेला आहे.

प्रियाला जेलमध्ये का टाकलं, तिच्यावर तुम्ही मुद्दाम सगळे खोटे आरोप केले असा आरोप अश्विन अर्जुनवर करतो. खोटारड्या प्रियाची विनाकारण बाजू घेत असल्यामुळे घरचे देखील अश्विनच्या विरोधात जाणार आहेत. हळुहळू सगळ्या गोष्टी मार्गावर येत असताना मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे. अर्जुनला जीवे मारण्याची धमकी दिली जाते.

सुभेदारांच्या खिडकीवर दगड फेकला जातो, यावर एक कागद गुंडाळलेला असतो. “अर्जुन आता वेळ आहे तुझा जीव घेण्याची…” अशी धमकी त्यावर लिहिलेली असते. अर्जुन-सायली या दोघांनाही ती चिठ्ठी वाचून धक्का बसतो. पण, सायली यावेळी खचून न जाता या कठीण परिस्थितीतून मार्ग काढणार आहे.

सायली अर्जुनला म्हणते, “आता जिथे मी तिथे तुम्ही…”

अर्जुन ऑफिसला जायला निघतो तेव्हाच सायली तिथे पोहोचते आणि त्याला अडवते. आज तुम्ही ऑफिसला जायचं नाहीये असं ती त्याला सांगते. यावर अर्जुन ऑफिसमध्ये मिटींग असल्याचं सांगतो. नवऱ्याचं बोलणं ऐकून सायली म्हणते, “तुम्ही वकील नंतर आहात…आधी तुम्ही माझे अहो आहात” असं बोलून सायली अर्जुनच्या हाताला तिचा पदर बांधते आणि त्याला पुढे सांगते, “आता जिथे मी तिथे तुम्ही”

बायकोने पदराशी बांधल्यावर अर्जुन देखील तिच्या मागे-मागे जातो असं ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता अर्जुनला नेमकी कोणी धमकी दिली, नवऱ्याला धमकी मिळाल्यावर सायली अर्जुनवरची सगळी संकटं दूर करेल का? याची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागात मिळतील.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचा हा विशेष भाग ६ आणि ७ ऑगस्टला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रात्री ८:३० वाजता प्रसारित केला जाणार आहे.