Tharala Tar Mag Fame Sayali & Arjun Romantic Dance : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सध्या जन्माष्टमीनिमित्त ‘ठरलं तर मग’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या ३ मालिकांचा महासंगम सुरू आहे. ‘अन्नपूर्णा निवास’ला ५० वर्षे पूर्ण होणार असल्याने सुभेदार कुटुंबीयांनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी अनेक पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. पण, या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासाठी महिपत, गायत्री आणि राहुल हे तिघं मिळून प्लॅनिंग करत असल्याचं या तीन मालिकांच्या महासंगममध्ये पाहायला मिळत आहे.
आयुष्यात कितीही संकटं आली तरी, सगळ्यावर एकत्र मात करून पुढे जायचं असा निश्चय सायली-अर्जुनने केलेला असतो. राहुलच्या तावडीतून कलाची सुटका झाल्यावर सगळे अन्नपूर्णा निवासमध्ये येतात. याठिकाणी जन्माष्टमीच्या कार्यक्रमात सायली-अर्जुन, तेजस-मानसी, कला-अद्वैत या तिन्ही जोड्या सुंदर डान्स करतात.
अन्नपूर्णा निवासमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात अर्जुन-सायलीने “मी किसन तुझा, तु माझी राधा. तुझ्या पिरतीत झालोया गं आधा…” या सुंदर गाण्यावर रोमँटिक डान्स केल्याचं पाहायला मिळालं. हे गाणं सोनाली सोनावणे आणि रोहित ननावरे यांनी गायलं आहे. या मूळ गाण्यात निलेश आणि फँड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात यांची जोडी झळकली आहे.
सायली-अर्जुनने या गाण्यावर डान्स करताना जन्माष्टमी स्पेशल पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं. दोघंही या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होते. सायली-अर्जुनचा डान्स व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांनी सर्वत्र व्हायरल केला आहे. यामध्ये दोघांची हटके केमिस्ट्री विशेष लक्ष वेधून घेते. या व्हिडीओवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये सध्या मधुभाऊंना सायलीच खरी तन्वी किल्लेदार असल्याचा संशय आलेला आहे. मात्र, ठोस पुरावा मिळाल्याशिवाय ते सायलीला तिची खरी ओळख सांगणार नाहीयेत. आता मधुभाऊंना सायलीची खरी पुराव्यासकट कशी व केव्हा समजणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रोज रात्री ८:३० वाजता प्रसारित केली जाते.