Tharala Tar Mag Fame Sakshi And Ashwin : ‘ठरलं तर मग’ मालिका गेल्या काही दिवसांपासून कोर्ट केसच्या निकालामुळे प्रचंड चर्चेत आहे. ही मालिका गेली अडीच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. याशिवाय टीआरपीमध्ये सुद्धा प्रत्येक आठवड्याला ही मालिका पहिल्या क्रमांकावर असते. यामुळे यामध्ये काम करणारे सगळेच कलाकार आता घराघरांत लोकप्रिय झाले आहेत.

अर्जुन-सायलीसह प्रतिमा, पूर्णा आजी, अश्विन, साक्षी, प्रिया, महिपत ही सगळी पात्र साकारणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ऑनस्क्रीन या मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. सायली-अर्जुन आणि प्रियामधले वाद पाहायला मिळतात. तर, अश्विन सुद्धा साक्षी शिखरेचा या मालिकेत राग करताना दिसतो. पण, ऑफस्क्रीन या सगळ्या कलाकारांमध्ये खूपच छान बॉण्डिंग आहे.

साक्षीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री केतकी पालवने नुकताच मालिकेच्या सेटवरून शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. यामध्ये चक्क अश्विन म्हणजेच अभिनेता प्रतिक सुरेश आणि केतकी ( साक्षी शिखरे ) एकत्र गाणं गात असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रतिक सुरेश उत्तम अभिनेता आहेच पण, त्याला गायनाची सुद्धा प्रचंड आवड आहे. त्याचे गाण्याचे रील्स व्हिडीओ बरेच व्हायरल झाले आहेत.

साक्षी-अश्विनने गायलं सुंदर गाणं

आता प्रतिकने केतकी पालवसह “गोरी तेरी आँखे कहे…” हे लकी अली यांचं सहाबहार गाणं गायलं आहे. हा अल्बम २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण, आज २४ वर्षांनी सुद्धा या गाण्याची लोकप्रियता घराघरांत कायम आहे. केतकी आणि प्रतिक या दोघांनी देखील हे गाणं तितकंच सुंदररित्या सादर केलं आहे. त्यांचं हे गाणं चाहत्यांच्या सुद्धा पसंतीस उतरलं आहे.

दरम्यान, मालिकेत सध्या साक्षी शिखरे जेलमध्ये असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. त्यामुळे हा व्हिडीओ शूट करताना सुद्धा ती त्याच गेटअपमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. आता खूनाच्या प्रकरणी साक्षी शिखरे किती वर्षे जेलमध्ये राहणार, तिला कोण मदत करणार या सगळ्या गोष्टींचा खुलासा मालिकेच्या आगामी भागांमध्ये करण्यात येईल.