Tharala Tar Mag Fame Chaitanya Sardeshpande : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट रोजी निधन झालं. ६९ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. गेल्या अडीच वर्षांपासून ज्योती चांदेकर ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. पूर्णा आजीच्या निधनानंतर जुई गडकरी, अमित भानुशाली, मोनिका दबाडे, प्रियांका तेंडोलकर या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला. जवळपास ५३ वर्षे त्या इंडस्ट्रीत कार्यरत होत्या, त्यामुळे मराठी कलाविश्वावर सुद्धा शोककळा पसरली आहे.
मालिकेतील कलाकार, सेटवर काम करणारे तंत्रज्ञ या सगळ्यांनीच सोशल मीडिया पोस्ट शेअर करत ज्योती चांदेकर यांना अखेरचा निरोप दिला. मात्र, यामध्ये अर्जुनचा सहकारी आणि खूप जवळचा मित्र चैतन्यची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने गेले दोन दिवस सोशल मीडियावर कोणती पोस्ट शेअर केली नव्हती. यामुळे काही चाहत्यांनी त्याच्याकडे विचारपूस केली. यावर अभिनेत्याने त्याच्या ब्रॉडकास्ट चॅनेलवर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
चैतन्य लिहितो, “तुमच्यापैकी अनेकांनी मला विचारलं की, माझ्या संवेदना, दु:खाबद्दल मी इन्स्टाग्रामवर काहीच का शेअर केलेलं नाही. मी त्या सगळ्यांना हे सांगू इच्छितो की, इन्स्टाग्राम हे माझ्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम नाहीये. माझ्या आठवणी, माझं दु:ख आणि आपण गमावलेल्या व्यक्तीशी असलेलं माझं नातं हे खूप वैयक्तिक आहे. सोशल मीडियावर मी काहीच शेअर केलं नाही, शांत होतो याचा अर्थ असा नाही की मला काळजी नव्हती. याचा अर्थ असा आहे की, मी माझ्या भावना खाजगीत ठेवतो. मी त्या भावना, आठवणी माझ्या हृदयात कायम जपून ठेवतो…त्या गोष्टी सोशल मीडियाच्या फिडवर मांडता येणार नाहीत.”

दरम्यान, ज्योती चांदेकर यांच्या पश्चात दोन मुली आहेत. लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही त्यांची लेक आहे. त्यांनी ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.